China Covid Explosion: चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणुतील नव्या उत्परिवर्तनाची माहिती मिळवण्यासाठी दैनंदिन करोना चाचण्यांत आढळलेल्या नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याची सूचना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मंगळवारी केली. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत चीमधील स्थितीचा उल्लेख करत देशात लॉकडाउन लागला होता हे विसरु नका याची आठवण करुन दिली आहे.
“महाराष्ट्रासह देशाला करोनामुळे फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये करोनाचे रुग्ण वाढले असल्याने त्यांना लॉकडाउन करावा लागला आहे. आपल्याकडे पहिला रुग्ण आढळला तेव्हा दुबईतून एक जोडपं आलं होतं. त्यानंतर चालकाला करोना झाला आणि तेथून पुढे संख्या वाढत गेली होती,” असं अजित पवारांनी सांगितलं.
“जपान, चीन, कोरिया, ब्राझील या देशांमध्ये करोनाचे नवे उपप्रकार सापडत आहेत. करोनाची साथ नव्याने आलू असून चीनमध्ये गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये बेड कमी पडत असल्याने कारसारख्या वाहनांमध्ये रुग्णांना दाखल केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी करोनाच्या नव्या उपप्रकाराची तपासणी आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे,” असं अजित पवार म्हणाले.
“आपण चीनमधील स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हायपावर कमिटी किंवा टास्क फोर्स तसंच जगभरात काय केलं जात आहे याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमणार आहोत का?,” अशी विचारणा केली. तसंच करोनाच्या नव्या उपप्रकाराचा प्रसार होऊ नये यासाठी पक्ष बाजूला ठेवून, एकत्रित येत विशेष काळजी घेण्याची गरज आहे असं आवाहन केलं. करोना वाढल्यास संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये गेला होता याचा विसर पडू देऊ नका. सरकारनेही याबद्दल काळजी घ्यावी असंही ते म्हणाले.
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टास्क फोर्स किंवा समिती गठीत करु अशी घोषणा केली. “तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. केंद्राशी समन्वय साधण्यात येईल. टास्क फोर्स किंवा समिती तात्काळ गठीत केली जाईल, जी बदलत्या स्थितीवर लक्ष ठेवून सूचना करेल आणि आपण त्याची आपण अंमलबजावणी करु,” असं फडणवीसांनी सांगितलं.