भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याबद्दल महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) एका २३ वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. सदर तरुणाचे नाव गौरव पाटील असल्याचे एटीएसने सांगितले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने एक्स या सोशल मीडिया साईटवर ही बातमी दिली आहे. हा तरूण नेव्हल डॉक येथे शिकाऊ उमेदवार म्हणून काम करत आहे.

अटक केलेला तरूण हा व्हॉट्सअप आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया साईटद्वारे पाकिस्तानमधील गूप्तहेर संघटनेच्या (Pakistan-based Intelligence Operative – PIO) संपर्कात होता. एटीएसने एकूण चार लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतर तीन लोक गौरव पाटीलच्या संपर्कात होते, असेही दहशतवादी विरोधी पथकाने सांगितले आहे.

एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक केलेला तरूण गौरव पाटील हा फेसबुकच्या माध्यमातून काही अज्ञात प्रोफाईलच्या संपर्कात होता. या प्रोफाईलला त्याने डोकयार्डवरील काही महत्त्वाचे व्हिडिओ आणि फोटो पाठविले होते. सदर तरूणाने काही गोपनीय माहिती पाकिस्ताच्या गुप्तहेर संघटनेला पुरविली असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला

दहशतवादी विरोधी पथकाने सदर तरुणाला नवी मुंबईती त्याच्या घरातून अटक केली. चौकशी दरम्यान हा तरुण हनी ट्रॅपचा शिकार झाले असल्याचे समोर आले आहे. फेसबुकवरील मुक्ता माहतो, पायल एंजल आणि आरती शर्मा या फेसबुकवरील प्रोफाईलशी तो संपर्कात होता.

हे तीनही प्रोफाईल पाकिस्तानमधून चालविले जात होते. या प्रोफाईलच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेरांनी पाटीलशी संपर्क साधला आणि त्यानंतर व्हॉट्सअपद्वारे त्यांचे चॅटिंग सुरू झाले. एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार भारतीय जहाजांसंबंधीची काही गोपनीय माहिती आणि प्रतिबंधित परिसराचे फोटो गौरव पाटीलने व्हॉट्सअपवर शेअर केले होते.

पैशांच्या मोबदल्यात माहिती पुरविली

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत सांगतिले की, पीआयओ या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेकडून गौरव पाटीलला माहितीच्या बदल्यात पैसे पाठविण्यात आले होते. हा सर्व प्रकार एप्रिल-मे आणि ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला. गौरव पाटील याच्यासह आणखी तीन लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या तिघांनीही या प्रोफाईलवरून चॅटिंग केली होती. गौरव पाटीलला अटक केल्यानंतर न्यायालयात सादर केले असता, न्यायालयाने एक आठवड्याची पोलिस कोठडी सुनावली.

एटीएस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, गौरव पाटीलला पाकिस्तानकडून खूप पैसे मिळालेले नाहीत. पण निश्चित रक्कम किती होती, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Story img Loader