काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता नाना पटोलेंच्या या व्हिडीओवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरुन आता भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा पुलावर अडकून पडल्यानंतर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता नाना पटोलेंच्या या वक्तव्यानंतर नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
“मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्ष झालीय राजकारण करतोय पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे….,” असे नाना पटोले या व्हायरल व्हिडीओमध्ये बोलत असताना दिसत आहेत.
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्या मतदार संघात विविध ठिकाणी सभा घेतल्या होत्या. संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेदरम्यान नाना पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केलं. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद पेटला आहे.
भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. देशाच्या पंतप्रधानांबद्दल काँग्रेसवाल्यांच्या मनात एवढा द्वेष आहे की ते पंतप्रधानांना मारण्यापर्यंत बोलत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हे वक्तव्य अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह आहे. काँग्रेस पक्षाच्या या विधानाचा पंजाबमध्ये झालेल्या घटनेशी संबंध आहे का?, असा सवाल संबित पात्रा यांनी केला आहे.
“मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे”; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
तर महाराष्ट्र भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नाना पटोलेंवर टीका केली आहे. “काँग्रेसचे नाना पटोले यांना ‘समुपदेशना’ ची गरज आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाजी यांचा मोदीद्वेष नवा नाही. या द्वेषापोटी आपण काय बोलतो आहोत याचे भान त्यांना राहिलेले नाही. मोदींच्या विरोधात वारंवार गरळ ओकल्याने आपल्याला राहुल गांधी ‘बक्षिसी’ देतील या समजापोटी ते वारंवार बेताल होऊ लागले आहेत. आज नानाजी जे काही बोलले आहेत ते पाहता त्यांच्या ‘समुपदेशना’ची गरज आहे असं दिसतं आहे. यापेक्षा त्यांच्या वक्तव्यावर वेगळया मार्गाने व्यक्त होता येणे अवघड आहे,” असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. नाना पटोले यांचे मोदींविषयीचे वक्तव्य भयंकर आहे. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. राजकारणात आपण एखाद्याला बोलू शकतो इथपर्यंत ठीक आहे. पण कोणाला मारु शकतो, हे वक्तव्य गंभीर आहे. नाना पटोले यांनी खरंच हे वक्तव्य केले असेल तर हा प्रकार दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अशी वक्तव्ये करत आहेत, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.