आयआरसीटीसीच्या मनमानी कारभारामुळे दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनातील कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर आहे. कॅन्टीनचालक हॉटेल स्नेहाच्या व्यवस्थापनाने तोटय़ामुळे कॅन्टीन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्चपासून खाद्यपदार्थाचे वाढीव दर आयआरसीटीसीने निश्चित केले होते. ज्यात चहापासून साऱ्या खाद्यपदार्थाचे दर वाढविण्यात आलेत. वाढीव दरामुळे केवळ आयआरसीटीसीला लाभ होतो व ग्राहकांना भरुदड सोसावा लागतो. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून तोटय़ात सेवा पुरवणाऱ्या हॉटेल स्नेहाच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी सायंकाळपासून कॅन्टीन बंद करण्याचा निर्णय आयआरसीटीसी व राज्य प्रशासनास कळवला.
राज्य शासनाने खान-पान सेवा पुरवण्यासाठी (सव्र्हिस प्रोव्हायडर) आयआरसीटीसीला कंत्राट दिले. आयआरसीटीसीने ३३ टक्के नफ्यावर हे कंत्राट पुण्याच्या स्नेहा हॉटेलला दिले. स्नेहा हॉटेल व आयआरसीटीसीचा करार १५ फेब्रुवारीला संपला आहे. मात्र आयआरसीटीसी व सदनातील अधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे संबंधित हॉटेल व्यवस्थापनाने सेवा देणे सुरूच ठेवले. १ मार्चपासून सुधारित दर लागू झाल्यानंतर मात्र हॉटेल व्यवस्थापनाने कॅन्टीन बंद करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी निवासी आयुक्त विपिन मलिक यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा