महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही गावांवर दावा सांगितला होता. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणावरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाकडून शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यातच आज ( १४ नोव्हेंबर ) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी बोम्मई यांनी पुन्हा महाराष्ट्राला डिवचलं आहे.
हुबळी विमानतळावर बोलताना बोम्मई यांनी म्हटलं की, “सीमाप्रश्नावर महाराष्ट्राकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात येत असलेला दावा मान्य नाही. महाराष्ट्राने राज्य पुनर्रचना कायद्याच्या ठरावाला आव्हान दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात अद्याप यावर निर्णय झाला नाही. पण, घटनात्मक दृष्टीकोनातून विचार केला तर, तो कायदा कायम ठेवण्यायोग्य नाही.”
हेही वाचा : “६५०० कोटी रुपये… मोदी सरकारचा २०१४ पासूनचा जाहिरातींवरील खर्च”
अमित शाहांबरोबरच्या बैठकीबाबत विचारले असता, बोम्मई म्हणाले, “आम्ही आमची कायदेशीर, प्रशासकीय आणि राजकीय भूमिका बैठकीत मांडणार आहे. पण, आमच्या भूमिकेशी कोणतीही तडजोड करणार नाही, हे आम्ही शाहांना सांगू. सीमाप्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याविषयावर जास्त भाष्य करू शकत नाही. मी भाष्य केल्यास, त्याचा खटल्यावर परिणाम होऊ शकतो,” असेही बोम्मईंनी सांगितलं.