बेळगावसह सीमाभागांमध्ये निर्माण झालेला तणाव आणि राजकीय वादावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह संयुक्त बैठक घेतली. न्यायालयात प्रश्न सुटेपर्यंत दोन्ही राज्यांनी भूभागांवर दावे करू नयेत, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिला. दरम्यान या संयुक्त बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह संयुक्त बैठक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये १५ ते २० मिनिटं चर्चा सुरु होती. यावेळी त्यांच्यात सीमावादासह राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
सीमावादावरील बैठक संपल्यानंतर अमित शाह यांनी माध्यमांसमोरच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना बैठकीसाठी बोलावलं होतं. यानंतर दोन्ही नेते रात्री त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. या बैठकीत राज्यपाल तसंच महाविकास आघाडीचा मोर्चा यासह राज्यातील अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं समजत आहे.
शाह यांनी बुधवारी संसद भवनातील ग्रंथालय इमारतीत दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ग्यानेंद्र यांच्याबरोबर बैठक घेतली. दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. संयुक्त समितीमध्ये प्रत्येकी तीन मंत्री आणि एका सनदी अधिकाऱ्याचा समावेश असेल. ही समिती सीमाभागातील अनेक छोटय़ा-छोटय़ा वादांबाबत सामोपचाराने तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल आणि केंद्र सरकारला अहवालही सादर करेल, असे शाह यांनी स्पष्ट केले.