राज्यात सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात मूळ शिवसेना कोणाची यावरुन वाद सुरु आहे. शिंदे गटाकडून आपणच मूळ शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत असल्याने संघर्ष सुरु असून प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आहे. त्यातच १२ खासदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दर्शवल्याने त्यांचं बळ वाढलं आहे. यादरम्यान शिवसेनेचा ताबा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात, उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेल्या शिवसेनेच्या बहुसंख्य नेत्यांनी एकत्र येऊन नवीन कार्यकारिणी स्थापन केली असल्याचं सांगितलं आहे. सोमवारी एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली होती.

शिवसेना खासदारांचा एक गट सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होता. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी बोलावण्यात आलेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांची पक्षाचे ‘मुख्य नेते’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

अशी आहे शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी

या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना मुख्य नेते म्हणून घोषित करण्यात आलं, तर दिपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली. तसंच तानाजी सावंत, विजय नहाटा, यशवंत जाधव, गुलाबराव पाटील यांची शिवसेना उपनेते म्हणून तर शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली.

१२ खासदार शिंदे गटात : लोकसभा गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती

शिवसेनेचे १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झालं आहे. शिंदे गटाने लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली असून, त्यास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य करूनही अखेर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात दाखल झाले. शिंदे गटाने लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांच्या जागी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करावी, अशी विनंती करणारे पत्र लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना मंगळवारी दिले. या पत्रावर स्वाक्षरी करणारे १२ बंडखोर खासदार तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली़ राज्यातील शिंदे गट-भाजपच्या युती सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

उद्धव यांनाही युती हवी होती : शेवाळे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शिवसेना-भाजपच्या युतीबाबत तासभर चर्चा केली होती. पण, महिन्याभरातच भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्याने ही चर्चा रखडली, असा दावा खासदार राहुल शेवाळे यांनी केला़ शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतरही उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती करण्यासाठी हिरवा कंदील दिला होता, असे शेवाळे म्हणाले.

Story img Loader