Dhruv Rathee FIR : प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीच्या विरोधात महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली हिच्याबद्दल खोटी पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. अंजलीने यूपीएससी परीक्षेला न बसताच उत्तीर्ण झाल्याची माहिती ध्रुव राठीच्या एक्स अकाऊंटवरून देण्यात आली होती. पोलिसांनी भारत न्याय संहिता कायद्याखाली अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. जाणुनबुजून एखाद्याची बदनामी करत सामाजिक शांततेला धक्का पोहोचवण्याबद्दल हा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार आगळीक करणारे विधान केल्याबद्दलही गुन्हा दाखल झाला आहे.
ध्रुव राठी हा युट्यूबवर चांगलाच प्रसिद्ध आहे. राजकीय, विश्लेषणात्मक व्हिडीओ ध्रुवकडून तयार केले जातात. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याने भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात काही व्हिडीओ टाकले होते. त्या व्हिडीओंना प्रसिद्धी मिळाली होती. भाजपा समर्थकांकडून ध्रुव राठीला अनेकदा लक्ष्य करण्यात येत असते. ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी टाकलेली पोस्ट ही थेट ध्रुव राठीच्या वैयक्तिक अकाऊंटवरून गेलेली नाही. ध्रुव राठी पॅरोडी या नावाने असलेल्या अकाऊंटवरून सदर पोस्ट करण्यात आली होती.
हे वाचा >> ‘ध्रुव राठीचं नाव रशीद, पत्नी पाकिस्तानी, दाऊदशी संबंध?’, व्हायरल मेसेजनंतर ध्रुव म्हणाला…
एक्सवरील ध्रुव राठीच्या पॅरोडी अकाऊंटवर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते, “भारत हा एकमेव असा देश आहे, जिथे तुम्ही यूपीएससी सारख्या परीक्षेला न बसताही उत्तीर्ण होऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी असणे आवश्यक आहे. ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हीने यूपीएससी परीक्षा न देताच त्यात यश मिळविले. अंजली बिर्ला ही व्यवसायाने मॉडेल आहे. मोदी सरकारने शिक्षणाच्या क्षेत्राची थट्टा उडवली आहे.”
अंजली बिर्लाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली?
अंजली बिर्लाने (२३) पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या तीनही परीक्षेत यश मिळविले. २०१९ साली झालेल्या मुख्य परीक्षेच्या निकालानंतर अंजली बिर्लाचे नाव मेरीट यादीत झळकले होते. अंजलीचा चुलत भाऊ नमन महेश्वरीने तक्रार दाखल केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याचे सांगितले जात आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोस्ट डिलीट
ध्रुव राठीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पॅरोडी अकाऊंटवरून पुन्हा एकदा पोस्ट टाकण्यात आली आहे. “महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पाठविलेली नोटीस पोस्टवर अपलोड करत नव्या पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्र सायबर सेलने सांगितल्यानुसार मी अंजली बिर्लाशी निगडित सर्व पोस्ट डिलीट करत आहे. मला सत्य माहीत नव्हते. त्यामुळे मी आंधलेपणाने इतरांच्या पोस्ट कॉपी करून त्या इथे अपलोड केल्या होत्या. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, अशा शब्दात माफी मागितली आहे.
ध्रुव राठीच्या अधिकृत एक्स अकाऊंटला २.६ दशलक्ष लोक फॉलो करतात. युटू्यब प्रमाणेच एक्सवरही त्याच अनेक चाहते आहेत. तर दुसरीकडे ज्या पॅरोडी अकाऊंटवरून वादग्रस्त पोस्ट टाकली गेली, त्या अकाऊंटला केवळ ८१ हजार फॉलोअर्स आहेत. या अकाऊंटच्या बायोमध्ये लिहिले आहे, “हे चाहत्याचे आणि विंडबन करण्याचे अकाऊंट आहे. याचा अकाऊंटचा मूळ ध्रुव राठीच्या अकाऊंटशीही काहीही संबंध नाही.”
कोण आहे ध्रुव राठी?
ध्रुव राठीने सुरुवातील ट्रॅव्हल व्लॉग सारखे व्हिडिओ तयार करून प्रसिद्धी मिळविली. त्यानंतर तो सामाजिक, राजकीय भाष्य करणारे व्हिडिओ करू लागला. १९९४ साली जन्मलेला ध्रुव राठी अवघ्या २९ वर्षांचा आहे. ध्रुव राठीचे कुटुंब मुळचे हरियाणामधील रोहतकचे असून ते सध्या जर्मनीत वास्तव्यास आहेत. ध्रुव राठीचे बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी ध्रुव जर्मनीत गेला.