लोकसभा निवडणुकीमुळे तापलेले वातावरण व आठवडाभरापासून वाढलेल्या उष्म्यामुळे त्रस्त झालेल्या दिल्लीकर मराठीजनांसाठी महाराष्ट्र दिनाची संध्याकाळ शब्द-सुरांचे शीतल चांदणे घेऊन आली. सार्वजनिक उत्सव समितीच्या पुढाकाराने झालेल्या या शब्द-सुरांच्या मैफिलीत मऱ्हाटी रसिक चिंब न्हाऊन निघाले. माय मराठीला आपल्या अभिजात कवितेने समृद्ध करणाऱ्या प्रसिद्ध कवींच्या रचना, संगीताचा साज व अनवट सुरांनी नटलेला हा कार्यक्रम पुण्याच्या ओमकार संस्थेने सादर केला होता.
रोजच्या जगण्या-वागण्यातील भाव-भावनांचे सहज-सुंदर वर्णन करणाऱ्या कवयित्री शांता शेळके यांच्या कितीतरी गीतांना रसिकांनी दिलखुलास दाद दिली. एकापाठोपाठ मराठी भावगीत, प्रणय गीत, युगल गीताची गुंफण करीत कलाकारांनी कार्यक्रमात रंगत आणली. उंबरठा सिनेमातील ‘सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या..’ या कविवर्य सुरेश भट यांच्या गीताला रसिकांनी मनापासून दाद दिली. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, सांज ये गोकुळी, तोच चंद्रमा नभात, पहिलीच भेट झाली. अशा एकाहून एक सरस गीतांनी महाराष्ट्र दिनाची संध्याकाळ दिल्लीकर मराठी रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली.
पुण्याचे विजय उपाध्ये, नीलेश श्रीखंडे, सौरव दफ्तरदार, राहुल घोरपडे, सुवर्ण माटेगावकर या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला. दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, महाराष्ट्रीय स्नेहवर्धक समाज, मराठा मित्र मंडळ, महाराष्ट्र परिचय केंद्र, सांस्कृतिक समन्वय समिती, बृहन्महाराष्ट्र मंडळ, राणी लक्ष्मी भगिनी समाज या मराठी संस्थांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शब्द-सुरांच्या मैफिलीत दिल्लीत महाराष्ट्र दिन साजरा
लोकसभा निवडणुकीमुळे तापलेले वातावरण व आठवडाभरापासून वाढलेल्या उष्म्यामुळे त्रस्त झालेल्या दिल्लीकर मराठीजनांसाठी महाराष्ट्र दिनाची संध्याकाळ शब्द-सुरांचे शीतल चांदणे घेऊन आली.
First published on: 03-05-2014 at 02:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra foundation day celebrated in delhi