शौर्याचा अत्युच्च आदर्श निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील चार मुलांसह २५ बालकांना २४ जानेवारी रोजी राजधानीत होणाऱ्या शानदार समारंभात राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. त्यापैकी प्रतिष्ठेचा भारत पुरस्कार आपल्या चार मित्रांना वाचवते वेळी प्राणांची आहुती देणाऱ्या गौरव कवडुजी सहस्रबुद्धे याला मरणोत्तर जाहीर झाला आहे. तीन मुलींनीदेखील या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.
दहावीत शिकणाऱ्या नागपूरच्या गौरवने हिंगणा रोडवरील टाकळी सीम भागातील अंबाझरी तलावात बुडणाऱ्या चार मुलांना स्वत:च्या जिवाची बाजी लावून वाचवले होते. ही घटना ३ जून २०१४ रोजी घडली होती. सुरुवातीला तीन मुलांना गौरवने वाचवले. परंतु चौथ्या मित्राला पाण्यातून सुखरूप बाहेर काढत असताना गौरवला प्राणाची आहुती द्यावी लागली होती. गौरवमुळे चार जणांना जीवदान मिळाले. या साहसी कर्तृत्वासाठी गौरवला मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’ घोषित झाला आहे. गौरवची आई रेखा सहस्रबुद्धे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
गौरवसह मोहित महेंद्र दळवी, नीलेश रेवाराम भिल, वैभव रमेश घांगरे या महाराष्ट्रीय मुलांना शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. प्रतिष्ठेचा गीता चोप्रा पुरस्कार तेलंगणाच्या शिवमपेट रुचिताला जाहीर करण्यात आला आहे. या आठ वर्षांच्या चिमुरडीने ट्रेनला धडकलेल्या शाळेच्या गाडीतील दोघांचे जीव वाचविले. तर संजय चोप्रा पुरस्कार १६ वर्षीय अर्जुन सिंग याला देण्यात येईल. वाघाशी दोन हात करीत आईला वाचविताना त्याने अतुलनीय शौर्य दाखविले. बापू गायधनी पुरस्कार मिझोरामच्या रामदिनतारा, गुजरातच्या राकेशभाई शानाभाई पटेल आणि केरळच्या आरोमल एस. एम. या किशोरांना देण्यात येईल. रामदिनतारा याने विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या दोघा जणांना वाचविले. राकेशभाईने विहिरीत पडलेल्या एका मुलाचे, तर आरोमलने बुडणाऱ्या दोघा स्त्रियांचे प्राण वाचविले.
इतर पुरस्कारार्थीमध्ये कशिश धनानी (गुजरात), मॉरिस येंगखोम व चोंगथाम कुबेर मैतेयी (मणिपूर), अँजेलिका तिनसाँग (मेघालय), साईकृष्ण अखिल किलांबी (तेलंगणा), जोईना चक्रवर्ती व सर्वानंद साहा (छत्तीसगढ), दिशांत मेहंदीरत्ता (हरयाणा), बीथोव्हन, नितीन फिलीप मॅथ्यू, अभिजीत के. व्ही. आनंदू दिलीप व मोहंमद शामनाद (केरळ) व अविनाश मिश्रा (ओडिशा) यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या भीमसेन आणि शिवांश सिंग यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहतील. ही शूरवीर बालके प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra four child get bravery award
Show comments