बेळगावसह सीमाभागांमध्ये निर्माण झालेला तणाव आणि राजकीय वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल धक्कादायक दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. दोन्ही राज्यांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी प्रथमच थेट हस्तक्षेप केला. न्यायालयात प्रश्न सुटेपर्यंत दोन्ही राज्यांनी भूभागांवर दावे करू नयेत, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे आणि बोम्मई यांना दिला. मात्र या बैठकीनंतर शाह आणि शिंदे यांनी बसवराज यांच्या ट्विटर हॅण्डल संदर्भात केलेल्या दाव्यामुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.
शाह यांनी बुधवारी संसद भवनातील ग्रंथालय इमारतीत दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ग्यानेंद्र यांच्याबरोबर बैठक घेतली. दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. संयुक्त समितीमध्ये प्रत्येकी तीन मंत्री आणि एका सनदी अधिकाऱ्याचा समावेश असेल. ही समिती सीमाभागातील अनेक छोटय़ा-छोटय़ा वादांबाबत सामोपचाराने तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल आणि केंद्र सरकारला अहवालही सादर करेल, असे शाह यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक ट्वीट केल्यानंतर सीमाभागांत तणाव वाढला. मात्र, बनावट ट्विटर खात्यावरून विधाने प्रसारित झाल्याचा दावा बोम्मई यांनी बैठकीत केला. २३ नोव्हेंबर रोजी बोम्मईंच्या नावे असलेल्या व्हेरिफाइड ट्विटर हॅण्डलवरुन अक्कलकोट आणि सोलापूरमधील गावांवर दावा सांगणारी ट्वीट करण्यात आलं होतं.
बोम्मईंच्या नावे असलेल्या व्हेरिफाइड ट्विटर हॅण्डलवरुन केलेल्या याच ट्वीटमुळे हा वाद पुन्हा चर्चेत आला आणि नंतरच्या घडामोडींमध्ये अगदी तो रस्त्यावरील हिंसाचारापर्यंत उतरला. मात्र आता ज्या ट्विटर अकाऊंट्सवरुन ही ट्वीट केली गेली ती खोटी असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही केला आहे. ही खाती उघडणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही शहांनी दिली.
“या विषयावर चर्चा झाली तेव्हा असं दिसून आलं की यासंदर्भात फेक ट्विटर अकाऊंट्सनेही (basavaraj bommai fake twitter account) मोठी भूमिका बजावली आहे. सर्वोच्च नेत्यांच्या नावाने खोटी ट्विटर खाती तयार करण्यात आली आणि ती व्हायरल केली गेली. हे प्रकरण गंभीर यासाठी आहे कारण या पद्धतीच्या ट्वीटमुळे दोन्ही बाजूकडील लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो आणि अनुचित घटना घडतात. जिथे जिथे या खोट्या ट्विटर हॅण्डलची प्रकरणं समोर आली आहेत तिथे एफआयआर दाखल केला जाणार. ज्यांनी हे केलं आहे त्यांनाही जनतेच्या समोर एक्सपोज केलं जाईल,” असं पत्रकारांशी संवाद साधताना अमित शाह म्हणाले.
एकनाथ शिंदेंनीही या खोट्या ट्विटर खात्यांचा उल्लेख केला. “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबरोबर मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटर आणि त्यावरुन करण्यात आलेल्या स्टेटमेंटबद्दल चर्चा केली. त्यांनी त्यावर स्पष्टपणे सांगितलं की हे माझं स्टेटमेंट नाहीय. हे ट्विटर हॅण्डल माझं नाही. अशाप्रकारचं कुठलं ट्विटर हॅण्डलवरुन स्टेटमेंट केलेलं नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनीही यासंदर्भातील बाब स्पष्टपणे मांडलेली आहे. कोणीतरी या प्रकरणात आगीत तेल ओतण्याचं काम करतंय,” असं शिंदे म्हणाले.
थेट केंद्रीय मंत्र्यांनी खोट्या ट्विटर हॅण्डलबद्दलचं विधान केल्याने नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. ही ट्विटर हॅण्डल नेमकी कोणी तयार केली? ती व्हेरिफाइड कशी झाली? या प्रकरणावर आधीच स्पष्टीकरण का देण्यात आलं नाही? यामागील नेमका सुत्रधार कोण? केंद्र सरकार कोणाला एक्सपोज करणार? हे आणि असे अनेक प्रश्न सध्या या दाव्यांनंतर उपस्थित होत आहेत.