काँग्रेसमधून भाजपात गेलेले अशोक चव्हाण आणि शिंदे गटात गेलेले मिलिंद देवरा यांच्यासह सहा उमेदवार मंगळवारी राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले. विजयी उमेदवारांमध्ये भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे, शिंदे सेनेचे देवरा, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे. २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असली तरी इतर कोणीही दावेदार नसल्याने या नेत्यांना विजयी घोषित करण्यात आले.
देवरा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे मानले आभार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानताना देवरा म्हणाले, “राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या नेत्यांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व समर्पित कार्यकर्त्यांचे आभार. मी संसदेत मुंबई, महाराष्ट्र आणि भारताच्या विकासासाठी काम करण्यास उत्सुक आहे.”
पीठासीन अधिकाऱ्यांनी मिलिंद देवरा यांना संसदेच्या वरच्या सभागृहातील जागेसाठी विजयी घोषित करणारे प्रमाणपत्रही दिले. गेल्या महिन्यात, माजी केंद्रीय राज्यमंत्री देवरा यांनी आपल्या नऊ नगरसेवक आणि ४५० समर्थकांसह शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेत प्रवेश केला होता.
भाजपाकडून डॉ. मेधा कुलकर्णी यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांनाही काल नियुक्तीपत्र देण्यात आले. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली.
गेल्या महिन्यात, केंद्रीय निवडणूक आयोगाने २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सहा मतदारसंघांसह १६ राज्यांमधील ५६ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या होत्या. नामांकन प्रक्रिया ८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती, तर नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी होती. दुसऱ्या दिवशी अर्जांची छाननी झाली. २० फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.
१३ राज्यातील जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
राज्यसभेच्या निवडणुका कशा होतात?
संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेली राज्यसभा हे स्थायी सभागृह असून, ते कधीही विसर्जित होत नाही. मात्र, या सभागृहाचे एक-तृतियांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. मूळ राज्यघटनेने राज्यसभा सदस्यांचा कालवधी निश्चित केलेला नाही. ती जबाबदारी संसदेकडे देण्यात आली. त्यानुसार संसदेने लोकप्रतिनिधी कायदा १९५१ पारित करीत राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत सहा वर्षे निश्चित केली आहे.
राज्यसभेला काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही म्हटलं जातं. यालाच वरिष्ठ हाऊस म्हणजे अप्पर हाऊसही संबोधलं जातं. राज्यसभेत जास्तीत जास्त २५० जागा असू शकतात तर, त्यापैकी १२ सदस्य राष्ट्रपतींकडून निवडले जातात. उर्वरित २३६ सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि २ सदस्य केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात.