SC NCP Hearing Updates, 09 October 2023 : भारतीय निवडणूक आयोग आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज दिवसभरात आपण याविषयीच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. त्याचबरोबर इस्रायल आणि हमासमधील युद्धावरही आपलं लक्ष असेल.
Mumbai Maharashtra Live News Today : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर
कल्याण: कल्याण पश्चिमेतील कोळीवली रस्त्यावरील एका चाळीत राहत असलेल्या महिलेच्या घरात शिरून एका अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने हल्ला करुन महिलेला गंभीर जखमी केले. रविवारी रात्री हा प्रकार घडला.
कोल्हापूर: कोल्हापूरच्या हद्दवाढी विरोधात पुन्हा एकदा प्रस्तावित १८ गावांतील ग्रामस्थांनी विरोध चालवला आहे. गुरुवारी सर्व १८ गावातील व्यवहार बंद करुन आंदोलन केले जाणार आहे.
डोंबिवली: काटई-बदलापूर रस्त्यावरील कोळेगाव जवळील नाल्यात सोमवारी सायंकाळी एक ओला कार नाल्यात पडली.
नागपूर: डी.जे.च्या आवाजाने कानांवर तर लेझर लाईट्समुळे डोळ्यांवर परिणाम होत असल्याने त्यावर बंदी घाला, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने केली आहे.या विरोधात पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली.सणासुदीच्या काळात विविध उत्सव साजरे केले जातात.
मुंबई: नागरिकांमधील मानसिक आरोग्याशी संबंधित रूग्णांची तपासणी, समुपदेशन, उपचार व पाठपुरावा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यां’मध्ये एप्रिल २०२३ पासून मानसोपचार सेवा पुरविण्यात येत आहे.
उरण : खारकोपर ते उरण रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झालेल्या जासई मधील प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला आंदोलनाचा इशारा दिला होता. या संदर्भात सोमवारी सिडको भवन बेलापूर मध्ये झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना सिडकोने पुन्हा एकदा आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकाविणाऱ्या बुलडाणेकर प्रथमेश जवकार याचे जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दूरध्वनीद्वारे चीन येथे असलेल्या प्रथमेश जवकारचे अभिनंदन केले.
राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाली असून पवार गट निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडत आहे. यावेळी अजित पवार गटाने आयोगासमोर १० मुद्दे मांडले.
एका बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या इमारतीचे बांधकाम घाईने पूर्ण केले जात आहे.
मारहाणीनंतर शुभम यास वरखेडी रस्त्यावर महापालिकेच्या कचरा केंद्राजवळ टाकून हल्लेखोर पसार झाले.
चंद्रपूर महापालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे किमान वेतनासाठी मागील चार दिवसापासून संपावर आहे. सफाई कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने शहरातील रस्त्यांची साप-सफाई झाली नाही. त्यामुळे रस्त्यावरमोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आहे.
सध्या अजित पवार गट निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडत असून अजित पवारांच्या वकीलाने म्हटलं आहे की राज्य आणि देशातील बहुसंख्य पदाधिकारी आमच्या बाजूने आहेत. विधीमंडळातील बहुमत आमच्या बाजूने आहे, या गोष्टी पाहून निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष कोणाचा हा प्रश्न उपस्थित होतो, त्यामुळे आमचं बहुमत विचारत घ्या. तसेच अजित पवार गटाने शिवसेनेच्या खटल्याचाही दाखला दिला. त्याचबरोबर एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही, असा युक्तिवादही अजित पवार गटाने केला आहे.
उडाण संस्थेने खोटी माहिती देऊन आपली शिक्षणाची तीन वर्ष फुकट घालविली. आपले आर्थिक नुकसान केले म्हणून ३८ विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पाच ते सहा किलो वजनाचे सैंधव मीठाचे तुकडे ट्रॅक्टर ट्राॅली, टेम्पोमध्ये भरून दरवर्षी पंजाबमधील विक्रेते ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात येतात.
नवी मुंबई :गेल्या महिन्याभरापासून नवी मुंबई शहरात वायू प्रदूषणाचा विळखा वाढतच आहे. विरोधात विविध स्तरातून आवाज उठवण्यात येत आहे. मात्र तरी देखील शहरातील प्रदूषण परिस्थिती कायम आहे. नवी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीच कारवाई होताना दिसत नाही,शिवाय प्रदूषणाचा त्रास आहेच.
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असताना आता महाराष्ट्रातून देखील मान्सून माघारी परतण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ सुरु झाली आहे.
गणेशोत्सवानंतर सोन्याचे दर सातत्याने कमी होऊन सोमवारी (९ ऑक्टोंबर) सकाळी ५७ हजार ७०० रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. हे दर लवकरच वाढण्याचे संकेत असल्याने दिवाळीतील सोन्याची खरेदी आताच करणे ग्राहकांसाठी फायद्याची असल्याचे मत नागपुरातील सराफा व्यवसायिकांनी नोंदवले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शुल्कवाढीचा निर्णय घेतला असून अखेर दरपत्रक जाहीर केले आहे. यामुळे बी.ए., बी.कॉम. करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुल्कापोटी सात हजारांवर शुल्क भरावे लागणार आहे.
पावसाळा संपला असला तरी यंदा पावसाची तूट कायम आहे. याचा परिमाण रब्बी हंगामावर होण्याची शक्यता असतानाच आता परतीच्या पावसावर जिल्ह्याची भिस्त असल्याचे चित्र आहे. यंदाच्या पावसाळ्यात अनियमित व अपुऱ्या पावसाची नोंद झाली.
अकोला व वाशीम जिल्ह्यातील ६०६ अवसायनात सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. त्यावर २३ ऑक्टोबरपूर्वी सहायक निबंधक सहकारी संस्था (पदुम) यांच्याकडे आक्षेप दाखल करता येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन मधिल १३७ पदांसाठी ऑनलाईन परीक्षा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात २१ पदांसाठी चार दिवस परीक्षा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या वेळापत्रक भाग-२, ७ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले आहे.
राज्यात ४ हजार ४६६ तलाठीपदांसाठी तब्बल ८ लाख ५६ हजार जणांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा ५७ टप्प्यात घेण्यात आली. त्यानंतर प्रत्येक टप्यात घेण्यात आलेल्या प्रनपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे.
पुणे : रेल्वे गाडीतून सुरू असलेली गांजाची तस्करी पुणे रेल्वे स्थानकावर पकडण्यात आली. गाडीतून ३२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाच्या द्रोणा या श्वानाने केली आहे.भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस पुणे स्थानकावर आल्यानंतर तिची तपासणी करण्यात आली.
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार यांचाच आहे. पक्षाची पायाभरणी त्यांनी केली आहे. देशातील बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे वेगळा निर्णय होणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. त्यातूनही आयोगाने वेगळा निर्णय घेतल्यास अदृश्य शक्ती ढवळाढवळ करतेय काय हे कळेल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल दरवाढीविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका त्यांनी मागे का घेतली? कुणाच्या सांगण्यावरून घेतली असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिकिया आली आहे. याचिका मागे घेण्यामागे काही ‘सेटलमेंट’ झाली आहे, असे मी म्हणणार नाही, असे सांगत अधिक भाष्य करणे टाळले.
"देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत नेतृत्व करावं", असं वक्तव्य शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले, "कोणीतरी ऐरागैरा उठतो आणि फडणवीसांची लायकी काढतो". दरम्यान, राऊतांच्या या टीकेला आता संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. संजय शिरसाट म्हणाले, "मी ऐरागैरा असेन पण दलाल नाही."
पिंपरी : काहीजण संकटात गेल्यामुळे अडचणीत गेले.अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले. ही परिस्थिती आहे. परिस्थिती कायम राहत नसते. परिस्थिती बदलत असते असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर जोरदार हल्ला केला.
जळगाव - शहरातील खड्डेमय व धूलिमय रस्ते, साफसफाईचा अभाव, दिवाबत्ती, तुंबलेल्या गटार यांसह विविध नागरी सोयी-सुविधांंसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे सोमवारी दुपारी महापालिका प्रशासन, आमदारांच्या विरोधात भजने गात आंदोलन करण्यात आले.
रेरा कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांची माहिती अद्यावत करणे विकासकांना (प्रवर्तक) बंधनकारक करण्यात आले आहे.
एक वर्ष लोटले तरीही उत्तीर्ण अभियंत्यांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. त्यामुळे पन्नासहून अधिक शिफारसप्राप्त उत्तीर्ण अभियंत्यांचे गेल्या आठ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरूच आहे.
"...तर सर्वोच्च न्यायालय विधीमंडळाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही", राहुल नार्वेकरांचं वक्तव्य
शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप करत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याप्रकरणी ११ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, ठाकरे गटाच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे की संविधानिक शिस्त पाळली जाईल आणि ती पाळायला पाहिजे. संविधानाप्रमाणे आपलं विधीमंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ या तिन्ही समान आहेत. यामध्ये कोणाचंही कोणावरही वर्चस्व नाही. त्यामुळे तिन्ही संस्था आपल्या कार्यक्षेत्रात राहून काम करत असतात. सर्वोच्च न्यायालय त्यांच्या याचिकांवर निर्णय घेईल. एखादा निर्णय जर नियमबाह्य असेल, घटनाबाह्य असेल तर सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. परंतु तसं काही नसेल तर सर्वोच्च न्यायालय इतर संस्थांच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही.