Marathi News Updates : बीडमधील संतोष देशमुख यांची हत्या, औरंगजेबाची कबर, कुणाल कामराची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक कविता यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यातच आज केंद्र सरकार लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडणार आहे. त्याचे महाराष्ट्रातही पडसाद उमटू लागले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या पक्षांच्या यावर प्रतिक्रिया येत आहेत. कुणाल कामरा प्रकरणही अजून धगधगत आहे. दुसऱ्या बाजूला बीडमधील तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड याला तुरुंगात मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आहे. या सर्व घडामोडी आणि राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड दौऱ्यासह राज्यातील पावसाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विमागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पावसाच्या बातम्यांवरही आपलं लक्ष असेल.
Mumbai-Maharashtra News Live Today, 2 April 2025 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
अजित पवार बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडे गैरहजर! माजी मंत्री नक्की कुठे आहेत? उपमुख्यमंत्री म्हणाले…
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार हे आज (२ एप्रिल) बीड दौऱ्यावर आहेत. मात्र, अजित पवारांच्या या दौऱ्यावेळी जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे हे गैरहजर असल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, बीडमधील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीचं कारण सांगितलं. अजित पवार म्हणाले, "आज धनंजय मुंडे गैरहजर आहेत. त्यांनी मला कॉल करून सांगितले की माझी तब्येत बरी नाही. मी दवाखान्यात दाखल होतो आहे. त्यामुळे येत नाही."
"दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या खंडपीठासमोर होणार", वकील निलेश ओझांची माहिती
दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी आजची सुनावणी पार पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले, या प्रकरणाची सुनावणी चुकून न्यायमूर्ती डेरे व न्यायमूर्ती रेवती मोहिते यांच्या खंडपीठासमोर लावण्यात आली होती. मी न्यायालयात नमूद केलं की हा खटला तुमच्याकडे नाही. महिलेविरोधातील गुन्ह्याचं हे प्रकरण न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे जायला पाहिजे. आता सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होईल. न्यायालयाने या खटल्याच्या नोंदीस परवानगी दिली आहे. खटल्याची पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. न्यायालयाने खूप लांबची तारीख दिली तर आम्ही लवकर सुनावणी व्हावी यासाठी विनंती करू.
ठाण्यातील दुकानाला आग
ठाणे : येथील वागळे ईस्टेट भागातील साठेनगर परिसरातील एका चाळीजवळ असलेल्या दुकानाला बुधवारी पहाटे आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य तसेच दुकानाचे काउंटर जळाले आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी दुकानातील नुकसान झाले आहे.
वागळे ईस्टेट भागातील रोड क्रमांक २२ येथे साठेनगर परिसरात संतोषी माता चाळीजवळ हरि ओम फरसाण मार्टचे दुकान आहे. बुधवारी दुपारी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास हरि ओम फरसाण मार्ट या दुकानाला आग लागली. यामध्ये दुकानात असलेले फरसाणचे साहित्य तसेच दुकानाचे काउंटर जळुन नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तातडीने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. ही आग ६.२० वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी दुकानातील फरसाण साहित्य तसेच काउंटर जळून नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.