बेळगाव : महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या राज्यात प्रवेश करू नये, असे सांगण्यात आल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी जाहीर केले. बेळगावसह सीमाभागातील मराठीबहुल ८६५ गावांसाठी महाराष्ट्र सरकारने आरोग्य विमा योजना राबविण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी हा इशारा दिला आहे.
हेही वाचा >>> चिथावणीखोर भाषणे नकोत! यवतमाळ व रायपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
बेळगाव तालुक्यातील बैलहोंगला तालुक्यात सैनिकी विद्यालयाचे उद्धाटन बुधवारी सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, की आमच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांबरोबर चर्चा केली असून तेथील अधिकाऱ्यांनी कर्नाटकात येऊ नये, असे कळविले आहे. सीमाभागातील मराठीबहुल गावांतील नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याची घोषणा महायुती सरकारने अर्थसंकल्पात केली होती. अलीकडेच याबाबत अध्यादेश जारी करून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी दिलेल्या इशाऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता महाराष्ट्र सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सीमाभागातील मराठीभाषकांचे लक्ष लागले आहे.