नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यांतील ९३ मतदारसंघांमध्ये मतदानाचा हक्क बजावला जाईल. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये १९० जागांवर मतदान झाले आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील सुरतची जागा भाजपने बिनविरोध जिंकली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिसऱ्या टप्प्यामध्ये गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघामध्ये गृहमंत्री अमित शहा सलग दुसऱ्यांदा भाजपचे उमेदवार असून २०१९ मध्ये त्यांनी ९ लाख मते म्हणजे ७० टक्के मते मिळवली होती. यावेळी राजकोटमधील लढत लक्षवेधी ठरली असून इथे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला मैदानात उतरले आहेत. क्षत्रिय व ओबीसी वादामुळे रुपाला वादात सापडले आहेत. सुरतमध्ये भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. २०१९ मध्ये गुजरातमधील सर्वच्या सर्व २६ जागा भाजपने जिंकल्या होत्या.

चौहान यांची परीक्षा

मध्य प्रदेशमध्ये दोन लक्षवेधी लढती होत असून गुणा या पारंपरिक मतदारसंघामधून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा उभे राहिले आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे निवडणूक लढवत आहेत. २०१९ मध्ये गुणामधून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. काँग्रेसअंतर्गत मतभेदाचा मोठा फटका शिंदेंना बसल्याचे मानले गेले होते. काँग्रेसमधील त्यांचे विरोधक व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यावेळी त्यांचा मूळ मतदारसंघ राजगढमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, त्यामध्ये दिग्विजय यांचा पराभव झाला होता. यावेळी ठाकूर यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. १८ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवणारे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यावेळी विदिशा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा >>> बीजेडी सरकार ४ जूननंतर कालबाह्य; ओडिशातील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा

मुलायमसिंह कुटुंबातील तिघे रिंगणात

उत्तर प्रदेशमध्ये दिवंगत मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातील तीन सदस्य लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुलायमसिंह यांच्या परंपरागत मतदारसंघ मैनपुरीमधून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची पत्नी डिम्पल पुन्हा उभ्या राहिल्या आहेत. फिरोजाबाद व बदायूँ या मतदारसंघांमध्ये मुलायमसिंह यांचे पुतणे व रामगोपाल यादव यांचे पुत्र अक्षय यादव तसेच, शिवपाल यादव यांचे पुत्र आदित्य यादव निवडणूक लढवत आहेत.

खरगेंच्या जावयामुळे लढत प्रतिष्ठेची

कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हावेरीमधून, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये घरवापसी करणारे जगदीश शेट्टार बेळगावमधून तर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी धारवाडमधून पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई राधाकृष्ण डोड्डामणी गुलबर्गामधून उभे राहिले आहेत. खरगेंचा हा पारंपरिक मतदारसंघ असून २०१९ मध्ये खरगेंना पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे यावेळी ही लढत खरगेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

● आसाम (४)● बिहार (५)● मध्य प्रदेश (८)● महाराष्ट्र (११)● उत्तर प्रदेश (१०)● गोवा (२)● गुजरात (२५)● छत्तीसगड (७)● कर्नाटक (१४)● पश्चिम बंगाल (४)● दादरा-नगर हवेली व दमण (१) व ● जम्मू-काश्मीर (१)

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra phase 3 elections voting for 11 lok sabha seats key contests for third phase of lok sabha elections zws
Show comments