Eknath Shinde vs Shivsena : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदारांची संख्या वाढतच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थक आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर आता तर शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीचं पत्र दिलं. तसेच गुवाहाटीतून आमदारांच्या पाठिंब्याचे फोटो, व्हिडीओ, पत्र जारी केले. यानंतर महाविकासआघाडीतील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक होत शिंदे गटाला बहुमत गुवाहटीतून नाही, तर मुंबईत येऊन विधीमंडळात सिद्ध करावं लागेल, असं सांगत सूचक इशारा दिला. या पार्श्वभूमीवर आज दिवसभरातील घडामोडींच्या प्रत्येक अपडेट्सचा आढावा.

Live Updates

Maharashtra Political Crisis Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय संकट चौथ्या दिवशीही कायम, वाचा प्रत्येक अपडेट... | Read in English

23:32 (IST) 24 Jun 2022
“…गद्दारांची अवलाद आपल्यात नको”, बंडखोर आमदारांविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील घडामोडींबाबत स्पष्ट वक्तव्य केलं असून गद्दारांची अवलाद आपल्यात नको असं म्हटलं आहे. सविस्तर बातमी

23:02 (IST) 24 Jun 2022
शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाही- उद्धव ठाकरे

शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाहीये, शिवसेना हा एक विचार आहे. हा विचार भाजपा संपवायला निघाला आहे. त्यांचा हा डाव आहे. हिंदुत्वाच्या व्होट बँकेत त्यांना दुसरा भागीदार नको आहे. जो-जो हिंदुत्वाबाबत बोलेलं तो त्यांचा शत्रू आहे. जेव्हा भारतात भाजपा-शिवसेनेला कुणी विचारत नव्हतं, तेव्हा हिंदु मतांची विभागणी होऊ नये, म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी भाजपाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. आज त्या युतीची फळं आपल्याला चाखायला मिळतायत, हे आपलं भाग्य आहे. - उद्धव ठाकरे

22:47 (IST) 24 Jun 2022
तुम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी करून यांना निवडून आणलं - उद्धव ठाकरे

ही आपली लोक तुम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी करून निवडून दिलेली माणसं आहेत. यांची ओळख शिवसैनिकांमुळे आहे. माझ्यासमोर बसलेले अनेकजण त्यांच्या मतदार संघात निवडून येऊ शकले असते. पण आपण त्यांना उमेदवारी दिली. तुम्ही या लोकांना निवडून आणलं. तुमच्यापैकी अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक होते, असाल. पण पक्षानं दिलेला आदेश पाळून, आपली इच्छा बाजूला ठेवून, तुम्ही पक्षानं दिलेला उमेदवार निवडून आणला, ही खरी निष्ठा, ही निष्ठा तुम्ही दाखवली. - उद्धव ठाकरे

22:39 (IST) 24 Jun 2022
आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला - उद्धव ठाकरे

तुम्ही राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जात आहात, ते तुम्हाला दगा देतील असं काहींनी सांगितलं होतं. मी म्हटलं ठीक आहे, त्यांच्या बाटलीवर तसं लेबल लावलं आहे. ते लेबल बघून आम्ही शंकराप्रमाणे विष प्राशन करत आहोत. बघुया काय होतंय. पण आज विशेष काय आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघंही आपल्या सोबत आहेत. सरकार असो वा नसो आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं शरद पवार आणि सोनिया गांधींनी जाहीर केलं आहे. पण आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. - उद्धव ठाकरे

22:34 (IST) 24 Jun 2022
गद्दारांची अवलाद आपल्यात नको - उद्धव ठाकरे

शिवसेनेसोबत कुणीच राहिलं नाही, असं चित्र रंगवलं जात आहे. पण तुम्हाला पाहून आनंद झाला. मी आता तुमच्या साथीनं महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. मी आधीच म्हटलं होतं, शिवसेना ही मर्दाची सेना आहे. आपल्यावर जेव्हा- जेव्हा कठीण प्रसंग आले. त्यावेळी ज्यांनी आपल्याला आव्हान दिलं. त्या सर्व पोकळ आव्हानवीरांना आपण राजकारणात संपवून पुढे गेलो आहोत. शिवसेनेच्या वर्धापनदिनी मी सांगितलं होतं की, आज परत सांगतो, शिवसेनेत गद्दारांची अवलाद नको. पण ती पुन्हा एकदा समोर आली आहे. - उद्धव ठाकरे

22:18 (IST) 24 Jun 2022
"IPLसारखं प्राइस टॅगवाले लोक आपल्याला नको"- आदित्य ठाकरे

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकताच ऑनलाइन पद्धतीने नगरसेवकांशी संवाद साधला आहे. नगरसेवकांना बोलताना ते म्हणाले की, "लोकांना बंड करण्याची किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा आहे. पण त्यांनी कोणत्या वेळेचा फायदा उचलला? तर जेव्हा मुख्यमंत्री आजारी होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. ते घराबाहेर पडू शकत नव्हते. त्या वेळेचा गैरफायदा त्यांनी स्वत:साठी घेतला. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं आहे की, आम्ही कुणालाही थांबवणार नाही, ज्यांना जायचं आहे, त्यांनी जा, कारण मनाने तिथे आणि शरीराने येथे, अशी लोक आपल्याला नको. ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे. ज्यांच्या मनात शिवसेना आहे. हृदयात शिवसेना आहे, अशी लोक आपल्याला पाहिजेत. कारण तेच लोक आपल्या समाजासाठी काम करू शकतात आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतात, आयपीएलप्रमाणे प्राइस टॅग लावलेली लोक आपल्याला नको आहेत. आपल्याला प्राइसलेस लोक हवी आहेत."

21:24 (IST) 24 Jun 2022
बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवार मैदानात? उद्धव ठाकरेंसोबत दोन तास चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेली बैठक नुकतीच पार पडली आहे. मागील दोन तासांपासून ठाकरे आणि पवार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. शरद पवार साडेसहा वाजता मातोश्रीवर दाखल झाले होते. ८ वाजून २० मिनिटांनी ते मातोश्रीतून बाहेर पडले आहेत. त्यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. सविस्तर बातमी

20:35 (IST) 24 Jun 2022
"शरद पवार गोड बोलून काटा काढतात", बंडखोर आमदार शहाजीबापू पाटलांची ऑडिओ क्लिप व्हायरल

मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. एकनाथ शिंदे ४० हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यांच्यासोबत सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील हे देखील आहेत. त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. सविस्तर बातमी

20:25 (IST) 24 Jun 2022
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक नुकतीच पार पडली आहे. मागील दोन तासांपासून त्यांच्यात चर्चा सुरू होती. या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत देखील या बैठकीला उपस्थित होते. शरद पवार साडेसहा वाजता मातोश्रीवर दाखल झाले होते. ८ वाजून २० मिनिटांनी ते मातोश्रीतून बाहेर पडले आहेत. बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

19:24 (IST) 24 Jun 2022
मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री निवासस्थानावर दाखल झाले आहेत. यावेळी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा असल्याचं सांगत जोरदार घोषणाबाजी केली आहे.

19:19 (IST) 24 Jun 2022
“…अन् लवकरात लवकर गुवाहाटी सोडा”, आसाममधील काँग्रेस नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

सध्या आसाम राज्यात मोठा पूर आला असून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच मुद्द्यावरून आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून लवकरात लवकर गुवाहाटी सोडा, अशी विनंती केली आहे. सविस्तर बातमी

18:45 (IST) 24 Jun 2022
शिवसेना सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

सांगलीचे शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार व पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अन्यायाला कंटाळून हा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी सांगली ग्रामीण भागातील पदाधिकारी ठाम उभे राहणार आहेत. आम्ही बाळासाहेब यांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आमचा बंड पक्षाविरोधात नाही, तर राष्ट्रवादी विरोधात आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पालकमंत्री जयंत पाटील हे दुजाभाव करतात. शिवसेनेची गळचेपी करत आहेत. वारंवार आम्ही पक्षाला सांगितले आहे पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सेनेच्या अनेक नेत्यांना खुनाच्या खटल्यात अडकवले आहे. शिवसेनेला निधी दिला जात नाही. अशी अनेक कारणे आहेत. आम्ही शिवसेना सोडणार नाही. जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी या अन्यायाच्या विरोधात आहेत, असं मत आनंदराव पवार यांनी व्यक्त केलं.

18:32 (IST) 24 Jun 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार मातोश्रीवर दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार मातोश्रीवर दाखल, अजित पवार, जयंत पाटीलही उपस्थित, बंडखोरांविरोधात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष

18:27 (IST) 24 Jun 2022
थोड्याच वेळात पवार-ठाकरेंमध्ये मातोश्रीवर महत्त्वाची बैठक

थोड्याच वेळात पवार-ठाकरेंमध्ये मातोश्रीवर महत्त्वाची बैठक, शिवसेनेतील बंडखोरीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष, अजित पवारही उपस्थित राहणार

18:12 (IST) 24 Jun 2022
संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही : एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं, "शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी भावपूर्ण प्रसंग सांगितला. आम्ही सर्व शिवसेनेतच, पण हा निर्णय घेण्याची वेळ का आली हे सर्वांनी समजून घ्यावं. संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचे मनात शल्य आहे."

https://twitter.com/mieknathshinde/status/1540305087276339201

18:09 (IST) 24 Jun 2022
बंडखोर शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक, कुर्लाचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड

https://twitter.com/LoksattaLive/status/1540314998953897984

17:50 (IST) 24 Jun 2022
आम्ही गेम चेंजर ठरलो, आमचा पाठिंबा नसता तर मविआ नसती : प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे म्हणाल्या, "महाविकासआघाडी एकत्र आहे. आम्ही आघाडीसोबत आहोत. आम्ही ही लढाई १०० टक्के जिंकू. बहुमत कोणाकडे आहे, गटनेतेपद कोणाकडे आहे ही कायदेशीर लढाई आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बंडखोरांच्या अपात्रतेबाबत पत्र पाठवलं आहे. त्यानुसार विधानसभेचे उपाध्यक्ष बंडखोरांना अपात्र ठरवतील अशी आम्हाला आशा आहे."

"काँग्रेस कधी संपणार नाही, कुणी संपवू शकणार नाही आणि कुणी तशी हिंमतही करणार नाही. आमचं अस्तित्व टिकून राहिलं. आम्ही गेम चेंजर ठरलो. आमचा पाठिंबा नसता तर महाविकासआघाडी नसती. आजही आमचा महाविकासआघाडीला पूर्ण पाठिंबा आहे," असंही प्रणिती शिंदे यांनी मत व्यक्त केलं.

17:27 (IST) 24 Jun 2022
यशवंत चव्हाण सभागृह येथून शरद पवार मातोश्री निवासस्थानी रवाना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंत चव्हाण सभागृह येथून मातोश्री निवासस्थानी रवाना झाले आहेत. आज सायंकाळी साडेसहा वाजता शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली जाणार असून पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.

16:48 (IST) 24 Jun 2022
"उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव, त्यांना अधिकार नाही"; अपक्ष आमदारांचं पत्र

"उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव, त्यांना आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार नाही"; अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांचं झिरवळ यांना पत्र, नरहरी झिरवळ विधानभवनात दाखल, बंडखोरांच्या आमदारकीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष

16:39 (IST) 24 Jun 2022
शिवसेनेच्या चिन्हासाठी ६ टक्के मतं मिळवावी लागतात : नीलम गोऱ्हे

"निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे शिवसेना पक्षाची घटना आहे. त्याप्रमाणे कार्यकारणीच्या सदस्यांमार्फत प्रक्रिया करावी लागेल. विधिमंडळ पक्ष वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा आहे. शिवसेनेच्या चिन्हासाठी ६ टक्के मतं मिळवावी लागतात. त्यामुळे विरोधकांना जोपर्यंत ४-६ टक्के मतं मिळत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग चिन्ह गोठवत नाही. त्यांना निवडणूक आयोगाकडे जायचं असेल तर त्यांनी जावं," असंही नीलम गोऱ्हे यांनी नमूद केलं.

16:35 (IST) 24 Jun 2022
बंडखोरांना आमदारकी वाचवण्यासाठी भाजपा किंवा प्रहारमध्ये विलिन व्हावं लागेल : नीलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्यांना त्यांची आमदारकी वाचवायची असेल, तर कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावं लागेल. तसं झालं नाही तर अपात्रतेतून सुटका मिळणार नाही. विलीन होताना नोंदणीकृत पक्षात विलिन व्हावं लागेल किंवा स्वतःचा गट काढावा लागेल. त्यामुळे त्यांना शिवसेना पक्षाचं नाव किंवा चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे त्यांना भाजपा किंवा बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये विलिन व्हावं लागेल."

16:04 (IST) 24 Jun 2022
शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलायची माझी लायकी नाही : अजित पवार

अजित पवार म्हणाले, "मी महाराष्ट्रापुरतं बोलतो. देशातील इतर विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बोलतात. शरद पवार यांनी एखाद्या विषयावर काही वक्तव्य केल्यावर त्यावर बोलायची माझी लायकी नाही."

15:57 (IST) 24 Jun 2022
सरकार बहुमतात, सरकारला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार : अजित पवार

अजित पवार म्हणाले, "आज सरकार बहुमतात आहे. त्यामुळे सरकारला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यानुसार निर्णय घेतले जात आहे. अनेक मंत्री मुंबईत आहेत आणि काम सुरू आहे."

15:55 (IST) 24 Jun 2022
एकनाथ शिंदे गुवाहाटीहून मुंबईला रवाना? राजकीय नाट्याला वेगळं वळण

महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला वेगळं वळण लागलं आहे. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाल्याची माहिती समजत आहे. याबाबतचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. सविस्तर बातमी

15:21 (IST) 24 Jun 2022
मविआ अनैसर्गिक, शिवसेनेत बंड होणारच होतं : उदयनराजे भोसले

मविआ अनैसर्गिक, शिवसेनेत बंड होणारच होतं, हे सरकार जवळपास पडलं आहे, धमक्या देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार, उदयनराजे भोसलेंचं शिवसेनेतील बंडखोरीवर वक्तव्य

14:50 (IST) 24 Jun 2022
हे सारं भाजपानं केलं, त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल : उद्धव ठाकरे

बाहेरच्या भोडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करण्याचं काम करण्यात येतंय, हे सारं भाजपाने केलं, त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल

14:40 (IST) 24 Jun 2022
एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? उद्धव ठाकरेंचा बंडखोर शिंदे गटावर हल्लाबोल

मला सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो, कोण कसं वागलं यात जायचं नाही, बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं पाप, माझं मुख्यमंत्रीपद मान्य नसणं राक्षसी महत्त्वकांक्षा, एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? नगरविकास खातं दिलं, माझ्याकडील दोन खाती शिंदेंना दिली, उद्धव ठाकरेंचा बंडखोर शिंदे गटावर हल्लाबोल

14:36 (IST) 24 Jun 2022
ठाकरे व शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, उद्धव ठाकरे यांचं बंडखोरांना आव्हान

ठाकरे व शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा. जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं? झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, पण तुम्ही झाडाची मुळं नेऊ शकत नाही, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे याचा बंडखोरांवर घणाघाती हल्ला

14:31 (IST) 24 Jun 2022
"मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले"; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर हल्लाबोल, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले, काहींना मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवल्याचा आरोप, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत जिद्दीने पुन्हा पक्ष उभा करण्याचं आवाहन

14:23 (IST) 24 Jun 2022
सातारा शहर आणि तालुका शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी, पदाधिकाऱ्यांकडून भूमिका स्पष्ट

सातारा : शिवसेनेतून बंडखोरी करणारे मंत्री एकनाथ शिंदे यांना आमदारांचा पाठिंबा वाढत असला, तरी त्यांचे मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील सातारा तालुका आणि सातारा शहर येथील सर्व शिवसैनिक शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. सातारा शहरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचे लावण्यात आलेले निनावी बॅनर लावण्यात आले. याच्याशी कोणत्याही सातारा शहर आणि तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संबंध नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलं. याबद्दलची अधिक माहिती सातारा शहर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब शिंदे उपशहर प्रमुख सचिन ढवळे, तालुका शिवसेनेचे उपप्रमुख प्रशांत नलवडे यांनी उद्धव ठाकरे यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे, अशा प्रतिक्रिया देखील माध्यमांशी बोलताना दिली.

Maharashtra Political Crisis, Maharashtra Live News Updates

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं बड

महाराष्ट्रातील राजकीय संकट चौथ्या दिवशीही कायम आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदारांची संख्या वाढतच आहे.

Story img Loader