शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड पुकारण्याची शक्यता असल्याने राज्यात निर्माण झालेल्या स्थितीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाष्य केलं असून केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारं पाडण्यासाठी कट आखले जात असल्याचा आरोप अशोक गेहलोत यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस दिल्लीमध्ये सत्याग्रह आंदोलन करत आहे. यादरम्यान अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“संविधानाची पायमल्ली केली जात असून सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाचा गैरवापर केला जात आहे. जेव्हा न्याय मिळत नाही तेव्हा आपण न्यायव्यवस्थेकडे जातो. पण आता न्यायवस्थाच दबावात आहे. हा खूप धोकादायक खेळ ठरत आहे,” असं अशोक गेहलोत म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात सर्व काही शक्य आहे. गुन्हे, अन्याय, अत्याचार सर्व काही शक्य आहे, असे गेहलोत म्हणाले. “भाजपाचा लोकशाहीवर विश्वास नाही. केवळ सत्ता बळकावण्यासाठी लोकशाहीचा मुखवटा घालून राजकारण केलं जात आहे,” असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला आहे.
Eknath Shinde Live Updates : कॅबिनेटची बैठक संपली; संभ्रम कायम
“हिंदुत्वाच्या नावाखाली देशात लोकशाही ढासळत चालली आहे, लोकांना आता समजत नाहीये, पण नंतर पश्चाताप होईल. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नाजूक असताना आणि अर्थव्यवस्था कमकुवत झाली असताना हे लोक (भाजपा) घोडेबाजार करत सरकारं पाडत आहेत,” अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली आहे.
राजस्थानमधील आमदारांना आगाऊ रक्कम म्हणून १० लाख रुपये वाटण्यात आले असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.