अवघ्या अडीच वर्षांपूर्वी बांधलेल्या दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाच्या भव्य वास्तूची डागडुजी करण्याची वेळ सरकारवर आली आहे. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या काळात बांधण्यात आलेले महाराष्ट्र सदन म्हणजे ‘बडा घर पोकळ वासा’ ठरले आहे. बांधकाम करीत असताना आवश्यक उपाययोजना न केल्याने वास्तूत वाळवी व झुरळांनी उच्छाद मांडला होता. अलीकडेच सदनात शास्त्रोक्त पद्धतीने औषधफवारणी करण्यात आली. त्यामुळे वाळवीचा उपद्रव कमी झाला असताना आता भिंतींवर ओल पसरली आहे. ही ओल घालविण्यासाठी पुन्हा एकदा डागडुजीस सुरुवात झाली असून त्यासाठी एका खोलीवर सुमारे सहा लाख रुपये खर्ची घालण्यात येतील. अर्थात ही रक्कम कंत्राटदाराकडून वसुलण्यात येत असली तरी पुन्हा एकदा महाराष्ट्र सदनाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. सदन निर्मितीच्या बदल्यात मुंबईतील भूखंड मिळवून ‘आर्थिक समता’ प्रस्थापित करणाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याने आता डागडुजीवर लाखो रुपये खर्च होत असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
बांधकाम खात्यातील घोटाळ्याप्रकरणी भुजबळ कुटुंबीयांची चौकशी सुरू असल्याने सदनाच्या डागडुजीवर प्रतिक्रिया देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. सदनात खोली क्रमांक ११० च्या बाह्य़ भिंतीची डागडुजी सुरू आहे. त्यामागे भिंतीवर ओल असल्याचे कारण प्रशासनातर्फे पुढे करण्यात आले. िभतींवर ओल येणे ही सामान्य बाब असली तरी कस्तुरबा गांधी रस्त्यावरील भव्य वास्तूच्या निर्मितीला केवळ अडीच वर्षे झाली आहेत. इतक्या कमी कालावधीत ओल येण्यामागे सांडपाणी (ड्रेनेज) व्यवस्थापन अयोग्य पद्धतीने करणे, हेच प्रमुख कारण आहे. सदनातील जवळजवळ सर्वच खोल्यांची ही समस्या आहे. याशिवाय स्नानगृहात (बाथरूम) पाणी तुंबते. सदन म्हणजे समस्यांचे आगार ठरले आहे. अशुद्ध पाणीपुरवठय़ामुळे अनेकदा सदनात निवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे कुणालाही खोली देण्यापूर्वी खोलीत फ्लशिंग (नळातून पाणी सोडणे) केले जाते. पाच मिनिटे पाणी वाया गेल्यानंतर अशुद्ध पाणी तर येत नाही ना, याची खात्री झाल्यानंतरच खोली दिली जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या आहे.
गतवर्षी शिवसेना खासदारांनी सदनात मिळणाऱ्या सुविधांविरोधात अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यातील प्रमुख समस्या भोजनालय व पाणी हीच होती. आता भोजनालय सुधारले असले तरी पाण्याची समस्या मात्र अजूनही कायम आहे. त्यात भिंतींवर ओल पसरण्याची भर पडली आहे.