Neelam Shinde Accident News: महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनी निलम शिंदेहीचा अमेरिकेत एका वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाला. कॅलिफोर्निया येथे १४ फेब्रुवारी रोजी निलम शिंदेला एका वाहनाने धडक दिली होती. निलमवर सध्या अतिक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघाताची बातमी मिळाल्यानंतर निलमच्या कुटुंबियांना तात्काळ अमेरिकेला रवाना व्हायचे आहे, यासाठी त्यांनी व्हिसा मिळावा म्हणून अर्ज केला आहे. हा अर्ज मंजूर व्हावा, अशी तिच्या कुटुंबियांनी विनंती केली असून या विनंतीची लवकर पूर्तता व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
निलमचे वडील तानाजी शिंदे यांनी मदतीसाठी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यात ते म्हणाले, १६ फेब्रुवारी रोजी आम्हाला अपघाताची बातमी समजली. तेव्हापासून आम्ही व्हिसा मिळावा म्हणून प्रयत्न करत आहोत. पण अद्याप आम्हाला व्हिसा मिळालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि परराष्ट्र खात्याला टॅग करून मदतीची विनंती केली आहे.
एनडीटीव्ही वाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही एक गंभीर घटना असून शिंदे कुटुंबियांच्या मदतीसाठी सर्वांनी प्रयत्न गरजेचे आहे. तसेच शिंदे कुटुंबियांशी आपला संपर्क झाला असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे भाजपाचे असून आमच्यात राजकीय मतभेद असले तरी अशा अडचणीच्या प्रसंगी ते मदत करण्यास कचरत नाहीत. जेव्हा जेव्हा विदेशातील भारतीय विद्यार्थ्यांवर काही अडचण येते, तेव्हा ते मदतीसाठी पुढे येतात. परराष्ट्र खात्याच्या मदतीचा मला चांगला अनुभव आहे. विदेशातील भारतीयांना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात.
दरम्यान शिंदे कुटुंबियांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, अपघातामध्ये निलमच्या हात आणि पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तसेच तिच्या वर्गमैत्रिणींनी आम्हाला १६ फेब्रुवारी रोजी अपघाताची माहिती दिली.
निलम शिंदेचे काका संजय कदम यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, रुग्णालयाने निलमच्या डोक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी आमची परवानगी घेतली. ती सध्या कोमात आहे आणि अशा कठीण प्रसंगी आमचे तिथे असणे गरजेचे आहे. रुग्णालयाकडून तिच्या प्रकृतीविषयी आम्हाला रोज माहिती दिली जात आहे, असेही कुटुंबियांनी सांगितले.