गुजरातच्या द्वारकामध्ये मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल ३५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे तब्बल १७ किलो मेफेड्रोन आणि हेरोईन सापडलं आहे. हा आरोपी महाराष्ट्राचा असून मुंब्र्याचा रहिवाशी आहे. विशेष म्हणजे हा भाजीविक्रेता आहे. देवभूमी द्वारका पोलिसांनी ही करवाई केली असून आरोपीकडे सापडलेल्या ड्रग्जची किंमत ८८ कोटी २५ लाख इतकी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १९ पाकिटं जप्त केली आहेत. याशिवाय अजून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे ४७ पाकिटं सापडली.

राजकोट रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीप मिळाल्यानंतर स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि स्थानिक गुन्हे शाखेने एकत्र कारवाई करत शेहजाद घोषी या व्यक्तीला आराधना धाम येथून ताब्यात घेतलं. “त्याच्या बॅगेत एकूण १९ पाकिटं सापडली. यामध्ये ११ किलो हेरोईन आणि ६ किलो मेफेड्रोन होतं. याची एकूण किंमत ८८ कोटी २५ लाख इतकी आहे,” अशी माहिती संदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेददरम्यान दिली.

गुजरातमध्ये गेल्या दोन महिन्यात करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. संदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “४४ वर्षीय आरोपी शेहजाद महाराष्ट्रातील ठाण्याचा रहिवासी आहे. तीन दिवसांपूर्वी तो खंभालिया येथे आला होता आणि आरती गेस्ट हाऊसमध्ये थांबला होता. त्याची हालचाल संशयास्पद असल्याचं आम्हाला आमच्या सूत्राने सांगितलं होतं. ड्रग्ज मिळाल्यानंतर पुन्हा ठाण्याला जाण्यासाठी तो बसची वाट पाहत असताना आम्ही त्याला ताब्यात घेतलं”.

देवभूमी द्वारकाचे पोलीस अधीक्षक सुनील जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी सकाळी ११ वाजता शेहजादला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर रात्रीपर्यंत जप्तीची कारवाई तसंच पंचनामा करण्याचं काम सुरु होतं. फॉरेन्सिक टीमने हेरोईन आणि मेफेड्रोन असल्याचं शिक्कामोर्तब केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला”. शेहजादच्या चौकशीनंतर अजून दोघांना देवभूमी द्वारकामधून अटक करण्यात आली. हे दोघे भाऊ असून त्यांच्याकडे ४७ पाकिटं सापडली.

“प्राथमिक माहितीनुसार, शेहजादला याआधी हत्येच्या गुन्ह्याखाली शिक्षा झाली होती. आम्ही त्याबद्दल अधिक माहिती घेत आहोत. ही तस्करी पाकिस्तानमधून समुद्रामार्गे झाल्याचा आम्हाला संशय आहे,” असं संदीप सिंह यांनी सांगितलं आहे.

Story img Loader