इटलीमध्ये महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर काही वेळातच खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. तसेच पुतळ्याच्या भिंतीवर खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्याबद्दल वादग्रस्त मजकूरही लिहिण्यात आला आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ सदर परिसर स्वच्छ करून घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इटलीमध्ये उद्या जी७ देशांची बैठक होणार असून या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. जी७ देशांची ५० वी परिषद इटलीच्या अपुलीया प्रांतातील बोर्गो एग्नाझिया या आलिशान रिसॉर्टमध्ये होत आहे. १३ ते १५ जून असे दोन दिवस ही परिषद चालणार आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी या परिषदेची माहिती देताना सांगितले की, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अपुलीयाला रवाना होणार आहेत.

इटलीत महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याच्या विंटबनेची माहिती देताना क्वात्रा म्हणाले की, भारतीय यंत्रणेने या घटनेची माहिती इटलीच्या यंत्रणेला दिली आहे. तसेच योग्य ती कारवाई करण्यासही सांगितले आहे. जे कुणी दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. बुधवारी माध्यमांशी संवाद साधत असताना क्वात्रा यांनी ही माहिती दिली.

मागच्या वर्षी कॅनडाच्या विद्यापीठातील परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली होती. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील विद्यापीठात खलिस्तानी कट्टरपंथीयांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma gandhi bust in italy vandalised by khalistani extremists kvg
Show comments