अध्यक्ष माओ झेडाँग यांच्या विचारधारेचा पगडा असलेल्या चीनमध्ये भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांना प्रवेश मिळाला आहे. भारताचे राजनैतिक अधिकारी पास्कल अ‍ॅलन नाझरेथ यांनी लिहिलेल्या ‘गांधीज आउटस्टँडिंग लीडरशीप’ या पुस्तकाचे प्रकाशन पेकिंग विद्यापीठात करण्यात आले. विशेष म्हणजे या पुस्तकाचा चीनच्या मँडॅरीन या भाषेत अनुवादही करण्यात आला आहे.
पेकिंग विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंडिया स्टडीज’तर्फे आणि भारताचे चीनमधील राजदूत एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. नाझरेथ यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मँडॅरीन भाषेतील अनुवाद, साउथ चायना नॉर्मल युनिव्हर्सिटीच्या इतिहास विभागातील प्राध्यापक शँग क्व्ॉन्यू यांनी केला आहे.
हे पुस्तक म्हणजे महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक, साहचर्याच्या आणि शांततावादी विचारांचा चीनमधील अधिकृत प्रवेश असल्याचे अनेक भारतीय अधिकाऱ्यांचे मत आहे. चिनी राज्यक्रांतीपासून गेली ६० वर्षे चीनवर माओ झेडाँग यांच्या विचारांचा पगडा होता. गेली काही वर्षे हा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसू लागला होता. याच मुहूर्तावर गांधी विचारांनी चीनमध्ये प्रवेश केला असल्याबद्दलचे समाधान भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
सत्याचे महत्त्व अधोरेखित करणारा एकमेव राजकीय नेता
लेखक पास्कल नाझरेथ यांनी पुस्तकाच्या प्रकाशनावेळी गांधीजींचे वेगळेपण अधोरेखित केले. ते म्हणाले, आज राजकीय जीवनातून प्रांजळपणा आणि सत्य हरवत चालले आहे. मात्र गांधीजी हे एकमेव राजकीय नेते असे होते  ज्यांनी सत्याचा प्रसार-अंगीकार केला.
विशेष महत्त्व कशासाठी?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमच एका अन्य विचारधारेच्या पुस्तकाच्या मँडॅरीन भाषेतील अनुवादास चीनच्या सरकारची अधिकृत परवानगी मिळाली आहे आणि तीसुद्धा जागतिक प्रकाशन हक्कांच्या विक्रीसह! या पुस्तकाचे आणखी एक महत्त्व म्हणजे चीनमध्ये बळावणाऱ्या ‘चंगळवादावर’ गांधीवादी विचार हेच उत्तम औषध असल्याचे लेखकाने या पुस्तकात नमूद केले आहे. ‘गांधीजींचे खेडय़ाबद्दलचे विचारही चीन सरकारसाठी मार्गदर्शक ठरतील’ अशी आशाही लेखकाने प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केली.

Story img Loader