Mahatma Gandhi Photo On Beer Cans : एका रशियन बिअर ब्रँडने त्यांच्या कॅनवर महात्मा गांधींचा फोटो लावल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर सोशल मीडियावर प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ओडिशातील सामाजिक-राजकीय नेते सुपर्णो सत्पथी यांनी गांधीजींचा फोटो असलेल्या रिवोर्ट बियर (Rewort beer) कॅनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर वाद पेटला आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सत्पथी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची आणि रशियन अधिकार्‍यांशी चर्चा करून हा मुद्दा निकाली काढला जावा अशी मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचे राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधी यांचा जगभरात सन्मान केला जातो, मात्र त्यांचा फोटो वापरून बिअरची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हा मुद्दा सत्पथी यांनी निदर्शनास आणून दिला आहे. त्यांनी एक्सवर या बिअर कॅन्सचे फोटो शेअर कले आहेत. “माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नम्र विनंती आहे की त्यांनी हा मुद्दा त्यांचे मित्र @KremlinRussia_E समोर मांडावा. रशियाची रिवोर्ट ही गांधीजींचे नाव वापरून बिअरची विक्री करत असल्याचे दिसून आले आहे…,” असे सत्पथी यांनी आपल्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील या बिअरचे कॅन हातात घेतलेल्या दोन तरूणांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांची कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

बिअर कॅनचे फोटो ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर या ब्रँडवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. अनेक वापरकर्त्यांनी ही अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी हा प्रकार म्हणजे भारताचा अपमान असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी यासाठी कंपनीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. या वादावर रिवोर्ट यांच्याकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma gandhis picture used on beer cans by russian rewort beer triggers outrage marathi news rak94