महेश काळे यांच्या सुरांनी इंडिया गेट परिसर मंत्रमुग्ध

राजधानीचा मानिबदू असलेल्या ‘इंडिया गेट’चा परिसर शनिवारी पहाटे मराठी स्वरांनी, सुरांनी एकदम सुरेल होऊन गेला. निमित्त होते राजधानीतील पहिल्यावहिल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे. या मैफलीतील प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या ‘निरागस सुरां’नी दिल्ली परिसरातील मराठी बांधव मंत्रमुग्ध झाले.

विविध क्षेत्रांत कार्यरत दिल्लीकर मराठी माणसांना एकत्र आणत दिवाळीची सुरेल भेट देण्यासाठी ‘दिल्ली मराठी प्रतिष्ठान’ या संस्थेने राजधानीत प्रथमच ‘दिवाळी पहाट’ आयोजिली होती. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. नरेंद्र जाधव आणि खासदार विनय सहस्रबुद्धे आदी या मैफलीसआवर्जून उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडिया गेटचा भव्य परिसर मराठमोळ्या संस्कृतीने नटलेला दिसत होता. पणत्या, रांगोळ्या आणि मोठय़ा कमानींनी वातावरण वेगळेच भासत होते. पहाटेची नीरव शांतता, राजधानीत प्रथमच पडलेलं धुक आणि थंडीची हलकी लाट अशा सुरेख वातावरणात मराठी स्वरांनी उपस्थितांना मोहवून टाकले.

पहाटे साडेसहा वाजता मफिलीला सुरुवात झाली. मफिलीच्या पूर्व रंगात ‘कृष्ण’ आणि ‘पांडुरंग’ यांच्या व्यक्तित्वाच्या छटा दर्शविणाऱ्या गीतांची उधळण आणि उत्तर रंगात नाटय़गीत, भावगीत, अभंग अशा सुरावटींचे सादरीकरण उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले.  ‘शीतलचलत पवन यारी’ या शास्त्रीय संगीताने नटलेल्या गीताने मफिलीची सुरुवात झाली.

अलबेला सजन आयो रे ही गाजलेली बंदिश, ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटातील ‘सूरनिरागस हो’ हे गीत तसेच ‘माझे जीवन गाणे’ या अवीट गीतांनी मफिलीत रंग भरला. महेश काळे यांनी शास्त्रीय गायनाच्या अंगाने सादर केलेले ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘अवघे गर्जे पंढरपूर’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ या सुरावटींना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. जवळपास साडेचार तास हा कार्यक्रम चालला.

Story img Loader