पीटीआय, कोलंबो : श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या लोकांना देशातून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी सरकारविरोधी निदर्शकांनी मंगळवारी बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तपासणी नाका उभारला. दरम्यान, देशातील आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटामुळे सत्ताधारी राजवटीविरुद्धचा हिंसाचार आणि निदर्शने अद्याप सुरूच आहेत.
महिंदूा राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर काही तासांतच ७६ वर्षांचे राजपक्षे यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यामुळे अधिकाऱ्यांना देशव्यापी संचारबंदी लागू करणे आणि राजधानी कोलंबोत लष्करी तुकडय़ा तैनात करणे भाग पडले. या हल्ल्यानंतर राजपक्षे समर्थक राजकीय नेत्यांविरुद्ध व्यापक हिंसाचाराला तोंड फुटले आहे.
‘लोकांच्या एका मोठय़ा गटाने कातुनायके विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तपासणी नाका उभारला आहे. सत्ताधारी आघाडीच्या निष्ठावंतांना देश सोडून जाण्यापासून रोखण्याचा ते प्रयत्न करत आहेत’, असे वृत्त एका दूरचित्रवाहिनीने दिले. बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या भागात कातुनायके विमानतळ म्हणून ओळखले जाते. महिंदूा राजपक्षे, त्यांची पत्नी व कुटुंबीय हे त्यांचे ‘टेंपल ट्रीज’ हे सरकारी निवासस्थानातून पळून गेले असून, त्यांनी देशाच्या ईशान्य किनाऱ्यावरील त्रिंकोमाली या बंदराच्या शहरातील एका नौदल तळावर आश्रय घेतला आहे.
पंतप्रदानांच्या टेंपल ट्रीज या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्रभर अश्रूधुराच्या नळकांडय़ा डागल्या. मंगळवारी सकाळी सुरक्षा दलांनी महिंदू व त्यांच्या कुटुंबाला सरकारी निवासस्थानातून बाहेर काढले, त्यावेळी जमावाला मागे सारण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पुन्हा अश्रुधुराचा मारा केला, तसेच ‘वॉर्निग शॉट’ डागले.
टेंपल ट्रीज सोडल्यानंतर महिंदूा व त्यांचे काही कुटुंबीय त्रिंकोमाली नौदल तळात असल्याचे वृत्त पसरल्यानंतर, या तळाबाहेरही निदर्शने सुरू झाली आहेत. सोमवारी निदर्शकांनी राजपक्षे यांचे हंबनटोटा येथील वडिलोपार्जित घर, तसेच १४ माजी मंत्री, माजी उपाध्यक्षांसह १८ लोकप्रतिनिधी आणि राजपक्षे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले नेते यांच्या घरांवर हल्ले चढवले होते. दरम्यान, ताज्या हिंसाचारात जखमी झालेल्यांची संख्या २४९ झाली असून, मृतांची संख्या ८ वर पोहचली आहे, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
हिंसाचार करणाऱ्यांवर गोळय़ा झाडण्याचे आदेश
हिंसाचार करणाऱ्यांवर गोळय़ा झाडण्याचे आदेश विमानतळ आणि नौदल तळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर निदर्शक जमा झाल्याने जो कोणी सार्वजनिक मालमत्तेची हानी करताना दिसून येईल, त्याच्यावर गोळय़ा झाडण्याचे आदेश लष्कराला देण्यात आले आहेत, असे श्रीलंकेच्या संरक्षण खात्याचे प्रवक्ते नलीन हेराथ यांनी मंगळवारी दिली.