श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांनी दोन महिन्यांपूर्वीेच्या निवडणुकीतील आपल्या अपमानास्पद पराभवाचे खापर भारत, अमेरिका आणि युरोपिअन देशांवर फोडले आहे.
अमेरिका, नॉर्वे आणि युरोपातील लोक माझ्याविरुद्ध काम करत होते आणि भारताची ‘रॉ’ ही गुप्तचर संस्थाही तेच करत होती हे उघड असल्याचे राजपक्षे यांनी हाँगकाँगच्या ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
अमेरिका व भारत या दोन्ही देशांनी त्यांच्या वकिलातींचा उपयोग मला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी केला, असे राजपक्षे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या श्रीलंका भेटीपूर्वी सांगितले.
गेल्या ८ जानेवारीला झालेल्या निवडणुकीत राजपक्षे यांचा पराभव झाल्यानंतर कोलंबोतील एका दैनिकाच्या वृत्तात असे म्हटले होते की, श्रीलंका फ्रीडम पार्टी व युनायटेड नॅशनल पार्टी यांना राजपक्षे यांच्याविरुद्ध एकत्र आणण्यात ‘रॉ’च्या एका अधिकाऱ्याचा हात होता आणि या अधिकाऱ्याला देश सोडण्यास सांगण्यात आले होते. तथापि, श्रीलंकेतील भारतीय राजदूताचा तीन वर्षांचा सामान्य कार्यकाळ या अधिकाऱ्याने पूर्ण केल्यामुळे त्याची बदली करण्यात आल्याचे सांगून भारताने हे वृत्त नाकारले होते.
श्रीलंकेच्या भूमीचा वापर मी कुठल्याही मित्रराष्ट्राविरुद्ध होऊ देणार नाही, अशी हमी मी भारताला दिली होती, परंतु त्यांच्या मनात काही वेगळेच होते, असे सांगून आपल्या कार्यकाळात चीनचे पायाभूत प्रकल्प सुरू करण्याच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा