श्रीलंकेतील कडवे बौद्ध आणि अल्पसंख्याक मुस्लिमांमधील संघर्षांनंतर तणाव वाढला असून धार्मिक गटांसह कोणत्याही प्रकारच्या दहशतवाद्यांनी श्रीलंकेला उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे रचले असतील तर ते धुळीस मिळविले जातील, असा स्पष्ट इशारा श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांनी दिला आहे. श्रीलंकेला उद्ध्वस्त करण्याचे कोणाचेही प्रयत्न पडेल ती किंमत देऊन हाणून पाडले जातील, असे ते म्हणाले. जे कोणी जाती धर्माच्या आधारे दुसऱ्यावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतील, त्यांनाही तसे करू दिले जाणार नसल्याचे राजपक्षे यांनी स्पष्ट केले.
श्रीलंकेतील बेरुवेला, धारगा आणि अलुतगामा या शहरांमध्ये अलीकडेच जातीय हिंसाचार उसळून त्यामध्ये चार जण ठार तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर राजपक्षे यांनी उपरोक्त इशारा दिला. अत्यंत कडव्या समजल्या जाणाऱ्या ‘बुद्धिस्ट फोर्स’ या संघटनेने रविवार व सोमवारी रात्री हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला.
श्रीलंकेला निर्माण झालेला धोका सर्वानीच लक्षात घेण्याची गरज असून या तणावास आटोक्यात आणण्यासाठी कोणीही पुढे येणार नसून शेवटी सरकारलाच जबाबदारी घ्यावी लागते, याकडे राजपक्षे यांनी लक्ष वेधले. कॅण्डी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील सर्व जातीजमातींमध्ये बंधुभाव आणि सहकार्याची व्यापक भावना असताना लहान समूहाच्या लोकांच्या एका गटास हे सहन होत नाही आणि हेच लोक जगाला चुकीची माहिती पुरवून देशाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप राजपक्षे यांनी केला.
श्रीलंकेला उद्ध्वस्त करण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे हाणून पाडू
श्रीलंकेतील कडवे बौद्ध आणि अल्पसंख्याक मुस्लिमांमधील संघर्षांनंतर तणाव वाढला असून धार्मिक गटांसह कोणत्याही प्रकारच्या दहशतवाद्यांनी श्रीलंकेला उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे रचले असतील तर ते धुळीस मिळविले जातील, असा स्पष्ट इशारा श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांनी दिला आहे.
First published on: 21-06-2014 at 12:27 IST
TOPICSमहिंदा राजपक्षे
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahinda rajapaksa ready to fight terrorism