राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांच्या मागणीसमोर झुकून, श्रीलंका फ्रीडम पार्टीची धुरा देशाचे नवे नेते मैत्रीपाल सिरिसेना यांच्या हाती सोपवण्याचे देशाचे माजी अध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांनी मान्य केले आहे.
मैत्रीपाल सिरिसेना हे सत्ताधारी श्रीलंका फ्रीडम पार्टीचे सरचिटणीस होते, परंतु निवडणुकीपूर्वी गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी वेगळी चूल मांडून राजपाक्षा यांना आव्हान दिल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
निवडणुकीत हरलेल्या राजपक्षे यांच्या निष्ठावंतांनीदेखील त्यांना पाठिंबा देण्यास नकार देऊन पक्ष फोडण्याची धमकी दिल्याचा दावा सिरिसेना यांनी निवडणूक जिंकल्यानंतर केला होता. पक्षाच्या काही सदस्यांच्या मागणीनुसार आता महिंद राजपक्षे यांनी पक्षाचे नेतृत्व राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांच्या हाती सोपवण्याचे मान्य केले असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.