टीव्हीवर मालिका सुरु होण्याआधी डिस्क्लेमर दाखवला जातो. या कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत. त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही असे त्यात म्हटलेले असते. लवकरच वाहिन्यांवर राहुल गांधींच्या भाषणाआधी हे भाषण काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी काहीही संबंध असा डिस्क्लेमर दाखवला जाईल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली.

महायुतीचे उमदेवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांची अमरावतीत सभा झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे महाठगबंधन असून लोकांना ठगण्यासाठी हे एकत्र आले आहेत. गांधी कुटुंबाने अनेकदा आश्वासने देऊनही गरीबी हटली नाही. राहुल गांधी तुम्ही काय खाऊन गरीबी हटवणार ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला.

७२ हजार कुठून देणार ? मोदींनी जप्त केलेल्या काळया पैशातून काँग्रेस पैसे वाटणार का? असा सवाल त्यांनी विचारला. दिल्लीतून एक रुपया पाठवला तर तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. शेती, सामाजिक, शिष्यवृत्ती, घरकुल योजनेचा पैसा थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतो. भ्रष्टाचार समाप्त करण्याचं काम मोदींनी केलं असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्यावेळी धरणग्रस्तांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. धरणग्रस्तांनी यावेळी फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.