रविवारी दिवसभर सोशल मीडियावर महुआ मोईत्रांच्या काही फोटोंची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. हे फोटो एका हॉटेलमध्या आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतले असल्याचं दिसत आहे. फोटोंमध्ये महुआ मोईत्रा यांच्यासमवेत शशी थरूरही दिसत आहेत. मात्र, फोटो क्रॉप केले असून फक्त शशी थरूर व महुआ मोईत्राच दिसतील अशा पद्धतीने ते एडिट करण्यात आले आहेत. काही फोटोंमध्ये मोईत्रा यांच्या हातात सिगार दिसत आहे. यावरून त्यांना ट्रोल केलं जात असताना आता त्यांनी त्या फोटोंवर स्पष्टीकरण देताना भाजपाला थेट आव्हान दिलं आहे.
नेमका काय आहे प्रकार?
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर परखड शब्दांत टीका करण्यासाठी ओळखल्या जातात. संसदेतही मोईत्रा आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करताना दिसतात. संसदेच्या बाहेरही विविध आंदोलनांमध्ये त्या सक्रीय असतात. त्यामुळे भाजपा व त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतच असतात. नुकतेच त्यांचे एका पार्टीतले फोटो व्हायरल होत असून हे फोटो भाजपाच्या ट्रोलर्सकडूनच व्हायरल केले जात असल्याचा दावा मोईत्रा यांनी केला आहे.
“महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे-भेटवस्तू घेतल्या”, भाजपा खासदाराचा आरोप…
काय आहे फोटोंमध्ये?
या फोटोंमध्ये महुआ मोईत्रा काँग्रेसचे राज्यसभा खासदार शशी थरूर यांच्यासह दिसत आहेत. एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डिनर पार्टीमधले हे फोटो असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हे नेमकं कधी घडलं, याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. या फोटोंमध्ये काही ठिकाणी महुआ मोईत्रा हातात मद्याचा ग्लास घेऊन शशी थरूर यांच्यासह फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. तर एका फोटोमध्ये हातातील सिगार पित असल्याची पोज मोईत्रा यांनी दिली आहे. यावरून त्यांना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
ट्रोलर्सला मोईत्रांचं उत्तर
दरम्यान, या फोटोंसाठी आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना मोईत्रा यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “भाजपाच्या ट्रोल सेनेकडून माझे काही खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचं पाहून मी सर्वात जास्त आश्चर्यचकित झाले आहे”, असं मोईत्रा यांनी एक्सवर (ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
“मला पांढऱ्या ब्लाऊजपेक्षा हिरव्या रंगाचे कपडे जास्त आवडतात. आणि तुम्ही फोटो क्रॉप का केलात? त्या डिनरसाठी उपस्थित असणाऱ्या इतर मान्यवरांचेही फोटो दाखवा. बंगाली महिला आयु्ष्य जगतात, असत्य नाही”, असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“मला सिगारेट्सची अॅलर्जी”
दरम्यान, आपल्याला सिगारेट्सची अॅलर्जी असल्याचं त्यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. “मी धुम्रपान करत नाही. मला सिगारेटची भयंकर अॅलर्जी आहे. मी एका सहकाऱ्याची सिगार हातात घेऊन फक्त फोटोसाठी पोज देत होते”, असं स्पष्टीकरण मोईत्रा यांनी त्या फोटोवर दिलं आहे.