तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ अर्थात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी महुआ मोईत्रा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यातून आता महुआ मोईत्रा यांच्या वकिलाने माघार घेतली आहे. हितसंबंधांच्या संघर्षाचा (conflict of interest) मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मोईत्रा यांच्या वकिलाने खटल्यातून माघार घेतली.
नेमकं प्रकरण काय आहे?
सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहादराई आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यात मागील काही काळापासून वैयक्तिक कारणातून संघर्ष सुरू आहे. वकील देहादराई हे मोइत्रा यांचे विभक्त साथीदार असल्याचे मानले जाते. मोईत्रा आणि देहादराई यांच्यात त्यांच्या पाळीव कुत्र्यावरून वाद सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत मोईत्रा यांनी देहादराई यांच्याविरुद्ध कथित घुसखोरी, चोरी, असभ्य संदेश पाठवणे आणि गैरवर्तन करणे अशा विविध कलमाअंतर्गत पोलीस तक्रारी दाखल केल्या आहेत, याबाबतचं वृत्त ‘पीटीआय’ने तृणमूलच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी रोख रक्कम स्वीकारल्याबाबत काही पुरावे वकील जय अनंत देहादराई यांनीच भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना पुरवले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहादराई यांनी असा दावा केला की, मोईत्रा यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायण यांच्यात हितसंबंधांचा संघर्ष आहे.
“गोपाल शंकरनारायण यांनी काल (गुरुवारी) मला फोन केला होता. त्यांनी पाळीव कुत्रा परत करण्याच्या बदल्यात सीबीआयची तक्रार मागे घेण्यास सांगितलं,” अशी माहिती शुक्रवारी (२० ऑक्टोबर) देहादराई यांनी न्यायालयात दिली. देहादराई यांच्या वक्तव्यानंतर न्यायमूर्ती दत्ता यांनी माईत्रा यांचे वकील शंकरनारायण यांना विचारणा केली की, या प्रकरणात तुम्ही प्रतिवादीच्या संपर्कात होता, हे तथ्य आहे का?
हेही वाचा- संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मोहुआ मोईत्रा लाच घेतात, भाजपाच्या निशिकांत दुबे यांचा गंभीर आरोप!
यावर मोईत्रा यांचे वकील शंकरनारायण न्यायालयात म्हणाले, “मी माझ्या क्लायंटशी (महुआ मोईत्रा) बोललो आणि सांगितले की मी जय अनंत देहादराई यांना ओळखतो, मला त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू द्या.” यावर न्यायमूर्ती दत्ता म्हणाले की, शंकरनारायण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असल्याने ते या प्रकरणात फिर्यादीचे वकील म्हणून हजर राहण्यास पात्र नाहीत. यानंतर महुआ मोईत्रा यांच्या वकिलाने ‘कॅश-फॉर-क्वेरी’ प्रकरणी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातून माघार घेतली आहे. याबाबतची पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.