इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेत्यांचे फोन केंद्र सरकार हॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे इशारेवजा संदेश अ‍ॅपल कंपनीकडून या नेत्यांना पाठवण्यात आले आहेत. “कदाचित शासनपुरस्कृत हल्लेखोर तुमचे आयफोन हॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे काही करत आहात, त्यामुळे हे हल्लेखोर तुमचे फोन हॅक करण्याची शक्यता आहे”, असे मेसेज या नेत्यांना पाठवण्यात आले आहेत. यामध्ये सध्या चर्चेत असणाऱ्या महुआ मोईत्रा, काँग्रेस खासदार शशी थरूर, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आदींचा समावेश आहे. या नेत्यांनी एक्सवर (ट्विटर) यासंदर्भातले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडतंय?

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर सध्या ‘कॅश फॉर क्वेश्चन’ प्रकरणात आरोप होत आहेत. या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच महुआ मोईत्रांनी मंगळवारी सकाळी अ‍ॅपलकडून आलेला इशारा देणारा संदेश पोस्ट केला. महुआ मोईत्रा या आयफोन वापरत असून शासनपुरस्कृत हॅकर्सकडून आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा हा इशारा होता. असाच संदेश काँग्रेस खासदार शशी थरूर, पवन खेरा, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनाही आले आहेत.

काय आहे या संदेशात?

प्रियांका चतुर्वेदींनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये हा मेसेज सविस्तर दिल्याचं दिसत आहे. “अ‍ॅलर्ट – शासनपुरस्कृत हल्लेखोर कदाचित तुमचा फोन हॅक करत आहेत. आम्हाला अशी शक्यता वाटत आहे. आम्हाला वाटतंय की तुमच्या अ‍ॅपल आयडीशी संलग्न आयफोन त्रयस्थ ठिकाणी बसून हॅक करण्याचे प्रयत्न सरकारकडून मदत मिळणारे हॅकर्स करत आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे करता, त्यामुळे तुमचे फोन हॅक करण्याचे प्रयत्न होत आहेत. जर हे हल्लेखोर यशस्वी झाले, तर ते कुठेही बसून तुमच्या फोनमधील संवेदनशील माहिती, संदेश किंवा अगदी कॅमेरा आणि मायक्रोफोनशीही छेडछाड करू शकतात. अर्थात, हेही शक्य आहे की हा अ‍ॅलर्ट चुकीचा असेल. पण तो गांभीर्यानं घ्यावा अशी तुम्हाला विनंती आहे”, अंसं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे.

इंडिया आघाडीच्या नेत्यांवर सायबर हल्ले?

दरम्यान, महुआ मोईत्रांनी अशा प्रकारचे संदेश आलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची यादी एक्सवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांच्याव्यतिरिक्त अखिलेश यादव, राघव चड्ढा, शशी थरूर, प्रियांका चतुर्वेदी, सीताराम येचुरी, पवन खेरा व राहुल गांधींच्या कार्यालयातील इतर नेत्यांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “हा सगळा प्रकार आणीबाणीपेक्षाही वाईट आहे”, असं मोईत्रा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शशी थरूर यांची खोचक पोस्ट

एकीकडे मोईत्रा यांनी टीका केली असताना दुसरीकडे शशी थरूर यांनी खोचक पोस्ट केली आहे. “हे संदेश अॅपलकडून आले आहेत. याची खात्री मी केली आहे. ते खरे आहेत. माझ्यासारख्या करदात्यांचा पैसा बिनकामी बसून राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यावर अशा प्रकारे खर्च होत असल्याचं पाहून आनंद होतोय. याशिवाय दुसरं काही महत्त्वाचं काम राहिलेलं नाही का?” असा खोचक सवाल शशी थरूर यांनी पोस्टमधून विचारला आहे.