तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा सध्या खूप चर्चेत आहेत. समाजमाध्यमांवर त्यांचे काही फोटो व्हायरल केले जात आहे. हे फोटो एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या पार्टीतले असून यात काँग्रेस नेते शशी थरूरही दिसत आहेत. तसेच हे फोटो केवळ शशी थरूर आणि महुआ मोईत्राच दिसतील अशा पद्धतीने एडिट करण्यात आले आहेत. तर काही फोटोंमध्ये मोईत्रा यांच्या हातात सिगार दिसत आहे. यावरून समाजमाध्यमांवर त्यांना ट्रोल केलं जात आहे. अशातच भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
निशिकांत दुबे म्हणाले, “संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा लाच घेतात. मोईत्रा यांनी अदाणी समूहावरून संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते”. झारखंडचे भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना याबाबत निवेदन दिलं आहे. दुबे यांनी निवेदनात म्हटलं आहे की महुआ मोईत्रा यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेऊन संसदेत अदाणी समूहावरून प्रश्न उपस्थित केले होते. संसदेत अदाणींवरून प्रश्न विचारून मोईत्रा यांनी हिरानंदांनी यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.
निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे महुआ मोईत्रा यांना लोकसभेतून निलंबित करण्याची मागणी केली आहे. दुबे यांच्या तक्रारीबद्दल महुआ मोईत्रा म्हणाल्या, अशा तक्रारीनंतर कुठल्याही प्रकारचा तपास किंवा चौकशी होणार असेल तर मी त्याचं स्वागत करते.
हे ही वाचा >> “…आता मुनगंटीवारांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत”, वाघनखांवरून बच्चू कडूंची टोलेबाजी
खासदार निशिकांत दुबे यांचा आरोप आहे की, संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात हिरानंदानी यांनी महुआ मोईत्रा यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू दिल्या होत्या. तसेच दर्शन हिरानंदानी यांनी २०१९ ची निवडणूक लढण्यासाठी मोईत्रा यांना ७५ लाख रुपये दिले होते. त्याचबरोबर मोईत्रा यांना महागडे आयफोनही दिले होते. महुआ मोईत्रा यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्याची डागडुजीदेखील केली होती.