संगणकावरील सर्वात लोकप्रिय व सक्षम कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) म्हणून ओळख असलेली ‘विंडोज एक्सपी’ ८ एप्रिलनंतर मात्र डोईजड ठरण्याची शक्यता आहे. येत्या ८ एप्रिलनंतर ‘एक्सपी’ला पुरवत असलेले सर्व तांत्रिक साहाय्य व अपडेट्स थांबवण्याच्या मायक्रोसॉफ्टच्या निर्णयामुळे त्यानंतर या प्रणालीवर काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांना वर्षांला ११९० कोटी रुपयांचा भरुदड सोसावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
‘विंडोज एक्सपी’चा आधार काढून घेण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने गेल्याच वर्षी जाहीर केला होता. त्यानुसार या प्रणालीवर काम करणाऱ्या भारतातील ४० लाखपैकी ८४ टक्के संगणकांना वेगळी प्रणाली बसवण्यात आली आहे. मात्र, भारतातील अनेक बँका, संस्था, कंपन्यांमधील संगणक एक्सपीवर कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. अशा कंपन्यांनी नवी प्रणाली बसवण्याचा खर्च आताच सोसला नाही, तर ‘एक्सपी’मुळे त्यांच्या खिशाला मोठी कात्री बसेल, असा अहवाल ‘आयडीसी’ या संशोधन संस्थेने दिला आहे. ‘आयडीसी’च्या अहवालानुसार, ‘एक्सपी’वरच संगणक कार्यरत ठेवण्याचा वार्षिक खर्च प्रत्येक ३०० डॉलर इतका आहे. सध्या हा खर्च ७५ ते १०० डॉलरच्या घरात आहे.
मायक्रोसॉफ्टने मंगळवारी दिलेल्या निवेदनानुसार, अजूनही ‘एक्सपी’वर कार्यरत असलेल्या १६ टक्के संगणकांपैकी ३५ टक्के संगणक सरकारी कंपन्यांचा आहे. बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांनीही अद्याप याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक करण बाजवा यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एक्सपी प्रणाली सोडून विंडोज ७ किंवा ८ कार्यान्वित करण्यासाठी बँका किंवा कंपन्यांना आता केवळ २८ दिवस (सुट्टय़ांचे दिवस वगळून) उरले आहेत. मात्र, अजूनही अनेक भारतीय कंपन्या विशेषत: बँका याबाबत खूपच धिम्या गतीने पावले टाकत आहेत.’
– करण बाजवा, मायक्रोसॉफ्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maintaining windows xp after april 8 may cost rs 1190 cryear