Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. सध्या पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पहलगाम हल्ल्याच्या काही तासानंतर आता बांदीपोरा भागामध्ये पुन्हा एकदा मोठी चकमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अल्ताफ लल्ली ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर भारतीय लष्कराच्या जवानांकडून दहशतवाद्यांच्या विरोधात सर्च मोहीम राबवण्यात येत असून कडक कारवाई करण्यात येत आहे. काश्मीरमधील बांदीपोरा येथे भारतीय सैन्याने पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) टॉप कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केल्याचं सांगितलं जात आहे. या चकमकीत दोन लष्करी जवानही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ जणांचा बळी गेला. या घटनेनंतर या हल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या एलईटी दहशतवाद्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी बांदीपोरा येथे संयुक्त शोध मोहीम राबवली असता यावेळी दोन्हीकडून चकमक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांकडून पाठलाग करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाला सुरुवातीच्या गोळीबारात दुखापत झाली होती. त्यानंतर या कारवाईत एलईटीचा कमांडर अल्ताफ लल्ली ठार झाला.

पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेखचं घर बेचिराख

पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा आता अ‍ॅक्शन मोडवर आहे. एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) जम्मू-काश्मीर पोलिसांबरोबर मिळून तपास सुरू केला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांमध्ये आसिफ शेख याचं देखील नाव समोर आलं होतं. त्यानंतर पोलीस व एनआयएचं एक पथक आसिफच्या त्राल (काश्मीर) घरी धडकलं. पोलीस आसिफच्या घरी तपास करत असतानाच त्यांना घरात काही संशयित वस्तू व स्फोटकं आढळली. त्याचदरम्यान या घरात मोठा स्फोट होऊन घर बेचिराख झालं.

पाकिस्तानकडून एलओसीजवळ गोळीबार

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चोहोबाजूंनी पाकिस्तानची नाकेबंदी सुरू केलेली असताना पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. गुरुवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने एलओसीजवळ (प्रत्यक्ष नियंत्रणरेषा) गोळीबार केला. भारतीय सैन्याने देखील या गोळीबाराला जशास तसं प्रत्युत्तर दिलं.