पापुआ न्यू गिनीच्या दक्षिण पॅसिफिक भागात सोमवारी शक्तिशाली भूकंप झाला असून अधिकाऱ्यांनी पॅसिफिक व उत्तरेकडे रशियापर्यंतच्या भागासाठी सुनामी लाटांचा इशारा जारी केला आहे. या भूकंपाची तीव्रता ७.७ रिश्टर होती व खोली ६५ किलोमीटर म्हणजे ४० मैल होती. ईशान्य पापुआ न्यू गिनी भागातील कोकोपो शहरापासून भूकंपाचे केंद्रस्थान ५० किलोमीटर अंतरावर होते, असे अमेरिकी भूगर्भशास्त्रीय संस्थेने सांगितले आहे.
पॅसिफिकच्या सुनामी इशारा केंद्राने म्हटले आहे की, कोकोपोपासून १००० किलोमीटर अंतरापर्यंतच्या प्रदेशात १ ते ३ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे, त्यानंतर रशिया, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, हवाई, मेक्सिको, ग्वाटेमाला, कोस्टारिका, पनामा, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, चिली व अंटाक्र्टिकात उशिरा सुनामी लाटा उसळण्याची शक्यता आहे. जपानच्या हवामान संस्थेने म्हटले आहे की, जपानला सुनामीचा कुठलाही धोका नाही. राजधानी पोर्ट मोरेसबाय येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतर प्रांतातील अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू आहे. भूकंप होऊन एक तास उलटून गेल्यानंतरही हानी झाल्याचे किंवा कुणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. कोकोपो येथे जोराचे धक्के बसले तेथे वस्तू एकमेकांवर आदळल्या.
दुपारच्या वेळी कुठल्याही लाटा उसळलेल्या दिसल्या नाहीत व सुनामी लाटा येतील किंवा निर्माण होतील, असे निश्चितपणे सांगता येत नाही, असे सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा