वृत्तसंस्था, तेहरान

दक्षिण इराणमधील राजाई बंदरामध्ये मोठा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत किमान पाच जण ठार झाले तर ५००पेक्षा जास्त जण जखमी झाले असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. इराणच्या बचाव विभागाचे प्रमुख बाबक महमुदी यांनी सरकारी वाहिनीवर ही माहिती दिली. तसेच या दुर्घटनेत किमान ५१६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

राजाई बंदर हे या इराणच्या मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बंदर अब्बास या शहराला लागूनच आहे. तिथून दरवर्षी सुमारे ७.२५ कोटी मेट्रिक टन मालाची वाहतूक होते. या स्फोटाच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला असून नेमके कारण काय हे अद्याप समजलेले नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, ऊर्जा प्रकल्पांमुळे हा स्फोट झालेला नाही किंवा स्फोटात या प्रकल्पांचे नुकसान झालेले नाही असे इराणच्या सरकारी वाहिनीने सांगितले. तसेच स्फोटामध्ये एक इमारत कोसळली असेही वृत्त देण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी मेहरदाद हसनजादेह यांनी सांगितले की सर्वात आधी मदतपथक पाठवण्याला आणि स्फोटाची जागा रिकामी करण्याला प्राधान्य देण्यात आले. या स्फोटाच्या काही ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्या असून स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात काळ्या धुराचे ढग बाहेर पडताना दिसत होते. काही दृश्यांमध्ये स्फोटानंतर, दूरवरच्या इमारतींच्या काचा फुटलेल्या दिसत होत्या.

इराणच्या तेल प्रकल्पातील केंद्रे जुने झाले असून तिथे निर्बंधांमुळे दुरुस्तीसाठी आवश्यक सुटे भाग मिळणे अवघड होते, त्यामुळे तिथे असे औद्याोगिक अपघात घडत असतात असे सांगण्यात आले.