जनता परिवारातील जुन्या पक्षांच्या विलीनीकरणासाठी आता मकरसंक्रांतीच्या महोत्सवाचा व्यासपीठ म्हणून वापर केला जात असून, काही ज्येष्ठ नेत्यांनी विलीनीकरणाची प्रक्रिया योग्य मर्गावर असल्याचा दावा केला आहे. जद(यू) आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मकरसंक्रांतीनिमित्त दोन वेगवेगळ्या मेळाव्यांचे आयोजन केले होते, त्याला पाच जुन्या जनता परिवारातील नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली. मात्र जद(यू)चे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची गैरहजेरी हा चर्चेचा विषय झाला होता.
जद(यू)चे अध्यक्ष शरद यादव, लालूप्रसाद यादव, भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे अभय चौताला, उत्तर प्रदेशचे मंत्री ओमप्रकाश सिंह, समाजवादी जनता पार्टीचे प्रतिनिधी हे दोन्ही मेळाव्यांना हजर होते. ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांची गैरहजेरी हा चर्चेचा विषय बनला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून नितीशकुमार हे तापाने आजारी असल्याने ते हजर नसल्याचा खुलासा राज्याचे मंत्री श्रावणकुमार यांनी केला. बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी हे दोन्ही मेळाव्यांना हजर होते. त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी आणि विधिमंडळ पक्षाचे नेते सदानंद सिंह यांनीही हजेरी लावून आपण धर्मनिरपेक्ष शक्तींबरोबर असल्याचे निदर्शनास आणून दिले. जनता परिवाराचे मीलन होणार आहे, असे समजा की झालेच आहे, असे लालूप्रसाद म्हणाले.

Story img Loader