‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा एक घातक आजार असून या पद्धतीचे समाजातून समूळ उच्चाटन केले पाहीजे. यासाठी सरकारने एखादा कायदा तयार करावा, अशी मागणी भाजपाचे खासदार धरमबीर सिंह यांनी केली आहे. लोकसभेत शून्य प्रहरात सदर प्रश्न उपस्थित करून सिंह यांनी लिव्ह इन आणि प्रेमविवाहाबाबत चिंता व्यक्त केली. प्रेमविवाहामुळे हल्ली घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रेमविवाहासाठी वधू-वराच्या पालकांची संमती असणे अनिवार्य करायला हवे. “मी सरकार आणि संसदेचे लक्ष या गंभीर विषयाकडे वळवू इच्छितो. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वज्ञानासाठी भारतीय संस्कृती ओळखली जाते. जगातील इतर देशांपेक्षा आपली समाज रचना वेगळी आहे. आपल्या विविधतेचे आकर्षण जगातील अनेक देशांना वाटते”, असे हरियाणामधील लोकसभा मतदारसंघाचे खासदार धरमबीर सिंह म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> “लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे फक्त टाईमपास, अशा अस्थिर नात्यांविषयी…”, उच्च न्यायालयाचे ताशेरे

सिंह आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, भारतात पालकांकडून ठरवून लग्न करण्याची पद्धत अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे. अशापद्धतीच्या लग्नात वधू आणि वराच्या आवडीनिवडी पाहिल्या जातात. तसेच सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली जाते. “लग्न हे पवित्र नाते असून भारतात ते सात जन्माशी जोडलेले आहे. अमेरिकेत ४० टक्के घटस्फोट होतात, त्या तुलनेत भारतात घटस्फोटाचा दर १.१ टक्के आहे. पालकांनी जुळवून आणलेल्या (arranged marriages) लग्नात घटस्फोटाचे प्रमाण अतिशय कमी आहे. तथापि, हल्ली घटस्फोटाचे प्रमाण अतिशय वाढले असून त्यामागे प्रेमविवाह हे सर्वात मोठे कारण आहे”, असेही सिंह म्हणाले.

“प्रेमविवाह करणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांची अशा लग्नासाठी परवानगी आहे का? हे तपासणे अनिवार्य करायला हवे, अशी माझी सूचना आहे. भारतात अनेक ठिकाणी एकाच गोत्रात लग्न न करण्याची परंपरा आहे. तसेच प्रेमविवाहामुळा गावागावत अनेकदा संघर्षाची परिस्थिती उद्भवल्याचेही पाहायला मिळाले आहे. या संघर्षाचे परिणाम सदर कुटुंबाला भोगावे लागतात. त्यामुळे अशा लग्नांसाठी पालकांची परवानगी घेणे अनिवार्य करायला हवे”, असेही सिंह यांनी आपल्या भाषणात म्हटले.

लिव्ह इन रिलेशनशिप घातक आजार

खासदार सिंह यांनी लिव्ह इन रिलेशनशिपला एक घातक आजार असल्याचे म्हटले. “यामुळे स्त्री आणि पुरुष लग्न न करता एकाच छताखाली राहत आहेत. “लिव्ह इन सारखे प्रकार पाश्चिमात्य देशात पाहायला मिळतात. पण हा आजार आता भारतात वेगाने पसरत असून त्याचे प्रतिकूल परिणामही पाहायला मिळाले आहेत. नुकतीच श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला यांचे प्रकरण प्रकाशात आले. त्यांच्यातही लिव्ह इन रिलेशन होते”, अशा शब्दात सिंह यांनी लिव्ह इन रिलेशनशिपवर टीका केली.

आणखी वाचा >> विश्लेषण: श्रद्धा वालकरच्या खुनाने हादरला देश; भारतात लिव्ह इन रिलेशनचे कायदे काय आहेत?

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यांनी एकमेकांचे निर्घृण खून केल्याचे अनेक प्रकार उजेडात आले आहेत. दिल्लीमध्येही अनेक प्रकरणे घडलेली आहेत. श्रद्धा वालकर प्रकरणात तर क्रौर्याची परिसीमाच गाठली गेली होती. “माझी विनंती आहे की, लिव्ह इन रिलेशनशिपवर बंदी आणण्यासाठी सरकारने कायदा करावा आणि या घातक आजाराला समाजातून कायमचे घालवून टाकावे”, अशी मागणी सिंह यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make consent of mother and father mandatory in love marriages says bjp mp dharambir singh in parliament kvg