माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मोदी सरकारवर तोंडसुख घेताना ‘मेक इन इंडिया’ आणि तिरस्कार ही धोरणे एकत्रितपणे राबवता येणे शक्य नसल्याचे सांगितले. ते हार्वर्ड विद्यापीठातील वार्षिक भारतीय अधिवेशनात बोलत होते. यावेळी शशी थरूर यांनी मोदी सरकारविरुद्धची भूमिका मांडताना म्हटले की, सत्ताधारी पक्षाकडून अल्पसंख्याक समाजाबद्दल केली जाणारी द्वेषमुलक विधाने ही भारताच्या शक्तीस्थळांना सुरूंग लावणारी आहेत. याच शक्तीस्थळांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची पत सुधारण्यापूर्वी देशांतर्गत पातळीवरील प्रश्न निकाली काढणे महत्त्वाचे असल्याचेही यावेळी थरूर यांनी सांगितले. तसेच भारतातील पायाभूत व उत्पादन क्षेत्राच्या बांधकाम आणि आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणारी परकीय गुंतवणूक देशात आणायची असेल तर, भारताची वैविध्यपूर्ण देश ही ओळख जपणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. मुळात आपल्या देशातील नागरिकांना निरोगी, चांगले आणि सुरक्षित ठेवणे या गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे आहे. सुरक्षितपणाचा अर्थ केवळ जिहादी हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवणे इतकाच नाही. देशाचा विकास झाला असला तरी तो सर्वांपर्यंत पोहचण्याइतपत नसल्याचे मत यावेळी थरूर यांनी मांडले. आपण एकीकडे देशात ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’सारख्या योजनांची भाषा करतो, त्यासाठी परदेशी गुंतवणूक देशात यावी असे आपल्याला वाटते. मात्र, दुसऱ्या बाजुला देशात तिरस्कार पसरवण्यास मुक्त वातावरण असेल तर हे साध्य होणार नाही, असे थरूर यांनी सांगितले.

Story img Loader