मध्य प्रदेशातील कोळसा खाण पट्टे वाटपातील कथित अनियमिततांशी संबंधित कोळसा घोटाळा प्रकरणांमध्ये माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता व इतर पाच जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात यावेत, असा आदेश विशेष न्यायालयाने गुरुवारी दिला.

गुप्ता यांच्याशिवाय ज्यांच्याविरुद्ध आरोपनिश्चिती करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, त्यात के. एस. क्रोफा व के. सी. सामरिया हे दोन वरिष्ठ लोकसेवक, आरोपी फर्म कमल स्पाँज स्टील अ‍ॅण्ड पॉवर लि. (केएसएसपीएल), तिचे व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार अहलुवालिया आणि चार्टर्ड अकाऊंटंट अमित गोयल यांचा समावेश आहे. गुन्हेगारी स्वरूपाचा कट, फसवणूक, लोकसेवकाकरवी गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात यासाठी भादंविनुसार, तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार या सहा आरोपींविरुद्ध खटला भरण्यात यावा, असा आदेश सीबीआयचे विशेष न्यायाधीश भारत पाराशर यांनी दिला. औपचारिकरीत्या आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयाने हे प्रकरण १४ ऑक्टोबरला सुनावणीसाठी ठेवले आहे. मध्य प्रदेशातील ठेसगोरा-बी रुद्रपुरी कोळसा खाण पट्टा केएसएसपीएलला देण्यातील कथित अनियमिततांचे हे प्रकरण आहे.

Story img Loader