पश्चिम बंगालमधील सिंगूरमध्ये ‘नॅनो’ मोटारीचा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी ताब्यात घेतलेल्या जागेवरील कब्जा सोडण्यासंदर्भात बाजू मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी टाटा मोटर्सला दिले. या जागेवर उभारण्यात येणारा प्रकल्प कंपनीने अन्यत्र हलवल्यामुळे आता ही जागा तेथील शेतकऱयांना परत द्यायला हवी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. एच. एल. दत्तू आणि न्या. दीपक मिश्रा यांच्या खंडपीठामध्ये यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली. मोटार निर्मितीसाठी टाटा मोटर्सने ही जागा ताब्यात घेतली होती. मात्र, आता तो उद्देश अस्तित्त्वात नाही. कंपनीने आपला प्रकल्प पश्चिम बंगालबाहेर हलवला आहे. अजूनही आम्हाला ती जागा हवी आहे, असे टाटा मोटर्स म्हणू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
ही जागा परत संबंधित शेतकऱय़ांना दिली पाहिजे, असे सांगून न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला याप्रकरणी शेतकऱयांनी टाटा मोटर्सकडून घेतलेले पैसे परत देण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

Story img Loader