तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हत्या होण्यापूर्वीच प्रियंका ही आपली खरी राजकीय वारसदार म्हणून योग्य आहे असे सांगितले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते माखनलाल फोतेदार यांनी अलीकडेच एका पुस्तकात केला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वगुणांबाबत त्यांना पक्षातूनच आव्हान मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वास आव्हान मिळणार आहे फक्त ते केव्हा एवढाच प्रश्न उरला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबतही असेच आव्हान दिले जाईल असे त्यांनी सूचित केले आहे.

राहुल गांधी हे त्यांचे वडील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणे राजकारणोत्सुक नाहीत. राहुल गांधी यांना खूप मर्यादा आहेत कारण राजीव गांधी यांना त्यांची आई इंदिरा गांधी यांनी राजकारणासाठी घडवले होते, असे फोतेदार यांनी ‘द चिनार लिव्हज’ या पुस्तकात म्हटले आहे. फोतेदार हे केंद्रीय मंत्री होते. त्यांनी सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली असून राहुल गांधी यांना पुढे आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे पक्षात अनेक समस्या निर्माण झाल्या. राहुल काँग्रेसची सूत्रे केव्हा स्वीकारतील याबाबत त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी हट्टी आहेत त्यांच्यात काही फारसा बदल दिसत नाही, नेता बनण्याची त्यांची इच्छा फार प्रबळ नाही. राहुल गांधी यांचे नेतृत्व लोकांना नको आहे व सोनिया गांधी यांचे चांगले दिवस आता मागे पडले आहेत. संसदेत विरोधी पक्षनेते नेमताना काँग्रेसने चुकीचे पर्याय निवडले. विधानसभा निवडणुकातही त्यांनी चुकीचे पर्याय दिले. नेहरू व इंदिरा गांधी यांनी एक रस्ता प्रशस्त केला होता तो आता बंद झाल्यात जमा आहे.
सोनिया गांधी यांना अजून पक्षात आव्हान मिळालेले नाही हे खरे असले तरी पक्षाचे पुनरुज्जीवन करणे ही त्यांची जबाबदारी आहे. राहुलना दोष देता येणार नाही कारण त्यांना राजकीय कौशल्येही दाखवता आलेली नाहीत त्यामुळे अंतिम जबाबदारी सोनियांवर जाते. सोनिया व राहुल यांना पक्षातून आव्हान मिळणार हे उघड आहे फक्त त्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट बघितली जात आहे.