पाकिस्तानातील किशोरवयीनांच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती मलाला युसुफझई हिला उपचारार्थ इंग्लंड येथे हलविण्यात आले आहे. मलाला हिच्यावर तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यांत ती गंभीर जखमी झाली होती.
मलाला हिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूने दिलेल्या अहवालाच्या आधारे तिला इंग्लंड येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र आणि राष्ट्रकुल व्यवहार मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. इंग्लंडने मलाला हिच्यावर उपचार करण्याची तयारी दाखविल्याने हा निर्णय घेतल्याचे या मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मलाला हिच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत ही बाब सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय राखण्यात आली आहे. मात्र रुग्णालयाच्या नित्य व्यवहारांवर कोणतेही विपरीत परिणाम होऊ न देता मलाला हिच्यावर योग्य उपचार करण्याची क्षमता असलेल्या रुग्णालयात तिला हलविण्यात आले आहे, तसेच तिच्यावरील सर्व उपचारांचा खर्च पाक सरकारतर्फे करण्यात येईल, असे या प्रसिद्धीपत्रकांत म्हटले आहे. मलाला हिला अन्य देशांत पाठविण्याचा निर्णय पाकिस्तानच्या नागरी तसेच संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला आहे.
दरम्यान, दहशतवाद विरोधी लढाईत आपण पाकिस्तानच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार असल्याचे इंग्लंडतर्फे स्पष्ट करण्यात आले. किशोरवयीन मुलांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी आणि स्त्री शिक्षणाबद्दल उघडपणे बोलणारी मलाला ही आपल्या सर्वासमोरील आदर्श असल्याचे इंग्लंडचे परराष्ट्र सचिव विलीयम हेग यांनी स्पष्ट केले.

Story img Loader