नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि महिला हक्क कार्यकर्त्यी मलाला युसूफझाई हिनेही हिजाबवरून कर्नाटकात सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. मलालाने ट्विटरवरुन या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे. कर्नाटकात हिजाब प्रकरण मंगळवारी आणखी चिघळले. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने तीव्र झाली असून, त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत. यामुळे शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने मंगळवारी घेतला आहे.
यावर आता मलालाने भाष्य केले आहे. “कॉलेज आम्हाला अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणे हे भयावह आहे. कमी किंवा जास्त कपडे घातल्याने महिलांच्या वस्तुनिष्ठतेवर आक्षेप घेतला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष थांबवले पाहिजे,” असे मलालाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हिजाबच्या वादामुळे कर्नाटकात सुरू झालेले आंदोलन मंगळवारी राज्यभर पसरले. कॉलेज कॅम्पसमध्ये दगडफेकीच्या घटनांमुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, सरकार आणि उच्च न्यायालयाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थिनींना हिजाब घालण्याच्या अधिकारासाठी त्यांच्या एका याचिकेवर न्यायालय विचार करत आहे. या प्रकरणाचे मोठ्या वादात रुपांतर झाल्यानंतर राज्य सरकारने राज्यभरातील शैक्षणिक संस्थांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.
कर्नाटकात हिजाब घालण्यावरुन वाद चिघळला; विद्यार्थ्यांनी तिरंग्याऐवजी लावला भगवा ध्वज, कलम १४४ लागू
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मंगळवारी उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये भगवी शाल आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्याने तणाव वाढला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, मुलांचा एक गट हिजाब परिधान केलेल्या मुलींसोबत गैरवर्तन करताना दिसत होता. मात्र, सोशल मीडियावर या मुलींच्या बाजूने समर्थनाचा वर्षाव झाला. हिजाब घालण्याच्या अधिकाराच्या मागणीसाठी आपला विरोध सुरू ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या मुलीने सांगितले की तिला शिक्षकांचा पाठिंबा आहे आणि ज्या मुलांनी तिला भगव्या शालीत रोखले ते बाहेरचे होते.
लोकसत्ता विश्लेषण: हिजाब आणि बुरख्यात फरक काय? जाणून घ्या मुस्लीम महिलांच्या पोशाखांविषयी
हिजाबच्या वादावर राजकारण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सरकारला शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती. एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विद्यार्थिनींना पाठिंबा दिला. “कर्नाटकमधील मुस्लिम विद्यार्थिनींनी हिंदुत्ववादी जमावाने चिथावणी देऊनही मोठे धाडस दाखवले आहे,” असे एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.