क्वालालम्पूर येथून उड्डाण केल्यानंतर मलेशियन एअरलाइन्सच्या बोइंग विमानाचा दोन तासांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटून ते दक्षिण चीनच्या समुद्रात कोसळले. या अपघातात विमानातील २२७ प्रवासी आणि १२ कर्मचारी ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
क्वालालम्पूर येथून उड्डाण केल्यानंतर विमानाचा दोन तास हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क होता. मात्र, त्यानंतर पहाटे पावणेतीनच्या सुमारास संपर्क तुटला. संपर्क तुटला त्यावेळी विमानाने व्हिएतनामी हवाईक्षेत्रात प्रवेश केला होता. विमानाने सुबांग हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. मात्र, त्यानंतर ते बेपत्ता झाले. बेपत्ता विमानाच्या शोधासाठी सिंगापूर, व्हिएतनाम व फिलिपाइन्सच्या हवाई दलांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दक्षिण चीनच्या समुद्रकिनाऱ्यावर तेलाचा तवंग दिसल्याचा दावा व्हिएतनामी हवाई दलाने केला आहे. हा तवंग अपघातग्रस्त विमानाचाच असावा असा कयास आहे.
दरम्यान, मृतांमधील चंद्रिका शर्मा या चेन्नईच्या रहिवासी असून एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यां आहेत. अन्न व कृषी संघटनेच्या (एफएओ) मंगोलियातील एका कार्यक्रमासाठी त्या जात होत्या. मुक्तेश मुखर्जी या मूळच्या भारतीय परंतु कॅनेडियन नागरिकत्व स्वीकारलेल्या प्रवाशाचाही मृतांमध्ये समावेश आहे. याव्यतिरिक्त मृतांमध्ये चीनचे १५४, मलेशिया ३८, इंडोनेशिया सात, ऑस्ट्रेलिया सहा, युक्रेन दोन, न्यूझीलंड दोन, कॅनडाच्या दोन तर इटली, रशिया, हॉलंड व ऑस्ट्रियाच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.
अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, ज्या सागरी परिसरात विमान कोसळले, तेथे चीनसह व्हिएतनाम, कंबोडिया, मलेशिया व फिलिपाइन्स या देशांच्या सागरी सीमा एकत्र येतात. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. अपघातग्रस्त विमानाच्या वैमानिकाला १८ हजार हवाई तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता.
अहमद जौहरी याह्य़ा, मुख्य कार्यकारी अधिकारी, मलेशिया एअरलाइन्स.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा