वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरु आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचा संस्थापक झाकीर नाईकवर कारवाई करण्यासाठी भारताने ठोस पुरावा दिला पाहिजे असं मलेशिया सरकारने स्पष्ट केलं आहे. मलेशियामधील नेते अन्वर इब्राहिम सध्या भारत दौऱ्यावर असून गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. ‘द हिंदू’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावर भाष्य केलं.
भारताने झाकीर नाईकसंबंधी कोणताही ठोस पुरावा अद्याप सादर केला नसल्याचं यावेळी अन्वर इब्राहिम यांनी सांगितलं. ‘झाकीर नाईकचा मुद्दा माझ्याकडे अद्याप उपस्थित करण्यात आलेला नाही. जोपर्यंत संपूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही आरोपांना महत्त्व देत नाही. आम्हाला ठोस पुरावा मिळाला पाहिजे. मलेशियाने नेहमीच दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. जर आम्हाला पुरावा मिळाला तर आम्ही नक्कीच कारवाई करु’, असं अन्वर इब्राहिम यांनी सांगितलं आहे.
फक्त विनंती केली म्हणून कारवाई केली जाणार नाही असंही यावेळी अन्वर इब्राहिम यांनी स्पष्ट केलं. चिथावणीखोर भाषणांद्वारे तरुणांना दहशतवादाकडे वळण्यास प्रवृत्त करण्यासह बनावट कंपन्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून तो दहशतवादी कारवायांसाठी उपलब्ध करुन दिल्याप्रकरणी डॉ. झाकीर नाईकविरोधात गुन्हा दाखल आहे. बेकायदा कारवाया करणाऱ्या संघटनेचा सदस्य असणे, फौजदारी कट कारस्थानाचा भाग असणे आणि बेकायदा कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे.
झाकीर नाईक हा इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा (आरआरएफ) संस्थापक आहे. त्याने २०१६ मध्ये भारतातून पलायन करत मलेशियात मुक्काम हलवला. त्याला तिथे स्थायी रहिवाशी म्हणून परवानगी देण्यात आली आहे. भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. मात्र अद्याप मलेशिया सरकारकडून सकारात्मक संकेत मिळालेले नाहीत.