मलाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत मलेशियन एअरलाईन्सच्या बेपत्ता विमानाचा माग काढण्यात यश आल्याचे तेथील लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. गेल्या चार दिवसांपासून मलेशियन एअरलाईन्सच्या बोईंग 777-200 ईआर विमानाचा शोध घेण्यात येतो आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. या विमानामध्ये 239 प्रवाशी आणि कर्मचारी होते. हे सर्वजण वाचली असण्याची शक्यता कमी आहे.
कोटा भारूनंतर या विमानाने आपला मार्ग बदलला आणि ते मलाक्काच्या सामुद्रधुनीवरून प्रवास करू लागले, असे लष्करातील सूत्रांनी सांगितले.
विमानामधून प्रवास करीत असलेल्यांपैकी कोणत्याही प्रवाशाने विमानाचे अपहरण केले का, एखादा प्रवासी मनोरुग्ण होता का, विमानात एखादा तांत्रिक दोष निर्माण झाला होता का, याचाही तपास करण्यात येतो आहे, अशी माहिती मलेशियातील पोलीसांनी दिली.
मलेशियन एअरलाईन्सचे हे विमान शनिवारी सकाळी क्वालालंपूरहून बीजिंगच्या दिशेने निघाले होते. क्वालालंपूर विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर तासाभरात त्याचा नियंत्रणकक्षाशी संपर्क तुटला होता. तेव्हापासून हे विमान बेपत्ता आहे.

Story img Loader