Search Operation for Missing MH370 Flight: साधारणपणे ११ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१४ साली मलेशियन एअरलाईन्सचं विमान MH370 अचानक बेपत्ता झालं आणि खळबळ उडाली. या विमानात मलेशियाच्या नागरिकांसोबतच पाच भारतीय नागरिकदेखील होती. त्यापैकीच एक होत्या क्रांती शिरसाट. पुण्यातील प्रल्हाद शिरसाट यांच्या पत्नी क्रांती शिरसाट तेव्हा बीजिंगहून याँगयांगला निघाल्या होत्या. पण मध्येच तब्बल २३९ प्रवाशांना घेऊन निघालेलं MH370 विमान रडारवरून गायब झालं! या विमानाचं काय झालं हे आजतागायत कुणालाही कळू शकलेलं नाही. आता पुन्हा एकदा विमानासाठी शोधमोहीम सुरू केली जात असताना क्रांती शिरसाट यांचे पती प्रल्हाद शिरसाट यांनी भावुक शब्दांत कोणतीही आशा उरली नसल्याची व्यथा मांडली आहे.

“काय घडलं, हेच माहिती नसणं फार वेदनादायी असतं”, असं प्रल्हाद शिरसाट सांगतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांतल्या भावना कुणालाही अगदी सहज टिपता येतील. “मी लोकांना भेटतो. जेव्हा त्यांना कळतं की त्यावेळी माझी पत्नीही त्या विमानात होती, तेव्हा ते मला विचारतात की तेव्हा नेमकं काय घडलं होतं. पण दुर्दैवाने त्या प्रश्नावर माझ्याकडे काहीच उत्तर नसतं”, अशा शब्दांत प्रल्हाद शिरसाट यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मार्च २०१४ मध्ये MH370 बेपत्ता झालं. शिरसाट सांगतात, “पुढची तीन वर्षं मी या आशेवर होतो की काहीतरी सकारात्मक घडू शकेल. पण मला वाटतं पहिल्या महिन्याभरातच मलेशिया प्रशासनानं जाहीर केलं होतं की विमानातल्या सगळ्यांचं निधन झालं आहे. त्यानंतर माझ्या आशा जवळपास संपुष्टात आल्या. कट-कारस्थानाच्या चर्चांमुळे फक्त कधीतरी आशा वाटायची”, असं प्रल्हाद शिरसाट सांगतात.

काय घडलं MH370 बाबत?

८ मार्च २०१४ रोजी MH370 विमानानं क्वालालंपूरहून बीजिंगला जाण्यासाठी उड्डाण घेतलं. त्यानंतर दक्षिणेकडे वळताच विमानाचा संपर्क तुटला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद शिरसाट हे नॉर्थ कोरियात आयरिश एनजीओ कन्सर्न वर्ल्डवाईडसोबत काम करत होते. “मी तिला घेण्यासाठी याँगयांग विमानतळावर निघालो होतो. पण रस्त्यातच मला विमान बेपत्ता झाल्याची बातमी समजली. मी विमानाचा क्रमांक तपासला, तोच होता”, असं ते म्हणाले.

MH370 ची शोधमोहीम!

MH370 बेपत्ता झाल्यानंतर मलेशिया सरकार, ऑस्ट्रेलिया आणि चीन यांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. जवळपास १ लाख २० हजार चौरस किलोमीटरचा भाग धुंडाळून काढला. पण विमानाचा शोध लागला नाही. शेवटी तीन वर्षांनंतर २०१७ मध्ये शोधमोहीम संपल्याचं जाहीर करण्यात आलं. २०१८ साली आणखी एक अपयशी शोधमोहीम झाली. त्यानंतर शिरसाट यांना मलेशिया सरकारकडून शोधमोहिमेबाबतचा तपशील येणं बंद झालं.

डिसेंबर २०२४ मध्ये मलेशिया सरकारने MH370 चा पुन्हा शोध घेण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. अमेरिकन शोध संस्था ओशियन इन्फिनिटीनं सादर केलेल्या प्रस्तावावर हा निर्णय घेण्यात आला. जर त्यांच्या हाती काही ठोस पुरावे लागले, तर त्याबदल्यात त्यांना ७० मिलियन डॉलर्स दिले जाणार आहेत. पण शिरसाट यांना आता आशा उरलेली नाही. “अशा बातम्या येत असतात. पण जोपर्यंत काही ठोस घडत नाही, तोपर्यंत या वृत्तांवर विश्वास ठेवता येणार नाही. मलेशियन सरकारवर माझा वैयक्तिक विश्वास उरलेला नाही”, असं प्रल्हाद शिरसाट म्हणाले.

“लोक येतात आणि माझ्याशी बोलतात. त्यांचं बोलून झालं की ते निघून जातात. त्यांच्यासाठी हा मुद्दा तिथेच संपलेला असतो. पण माझ्यासोबत तो मुद्दा उरतो. तो माझ्यासोबतच राहतो. मी त्यासोबतच जगतो…आणि हे सगळं तुम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही”, अशा शब्दांत प्रल्हाद शिरसाट यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Story img Loader